महावितरणाच्या खामगाव ग्रामीण नवीन उपविभागीय कार्यालय व दोन वीज वितरण केंद्राच्या निर्मीतीला मंजुरी !

आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्याला यश

 खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क(8208819438)

महावितरण खामगाव ग्रामीण  उपविभागाच्या   विभाजनाची प्रक्रिया अखेर पूर्णत्वास आली असून, यामुळे नागरिकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांचा तोडगा निघाला आहे. महावितरण कंपनीने खामगाव ग्रामीण उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभागीय कार्यालय निर्मिती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे खामगावच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा अखंडित होण्याची आशा निर्माण झाली आहे.

महावितरणच्या खामगाव ग्रामीण उपविभागात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडला होता. या उपविभागाच्या वितरण केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त अधिभार झाल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाजांवर विपरीत परिणाम होत होता.

खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यांनी खामगाव ग्रामीण उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभागीय कार्यालयाची निर्मिती आणि सजनपुरी व पळशी येथे वीज वितरण केंद्र उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. २०१५ पासून त्यांनी शासनाकडे या मागणीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते, आणि अखेर त्यांना यश मिळाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महावितरण विभागाला या कामाला तातडीने प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. या अंतर्गत खामगाव ग्रामीण उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभागीय कार्यालयाची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय सजनपुरी व पळशी येथे नवीन वीज वितरण केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

नवीन उपविभागीय कार्यालयामध्ये आवश्यक त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्यामुळे या उपविभागाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल. नवीन वीज वितरण केंद्रे उभारल्यामुळे खामगाव ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार असून, शाखा कार्यालयांच्या माध्यमातून तात्काळ सेवा दिल्या जातील.

खामगाव मतदार संघातील नागरिकांची दीर्घकालीन वीज समस्या या निर्णयामुळे सुटणार आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे खामगाव ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. यामुळे शेतकरी, लघु उद्योजक, विद्यार्थी, आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

या निर्णयामुळे खामगाव मतदार संघातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवल्याबद्दल नागरिकांनी आमदार आकाश फुंडकर यांचे आभार मानले आहेत.


का

Post a Comment

أحدث أقدم