कंत्राटी,आऊट-सोर्सिंग,सुरक्षा रक्षक व प्रगत प्रकल्प हजारो कामगाराचे राज्यव्यापी संमेलन खामगाव येथे संपन्न
विज कंपन्यातील कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे धोरण निश्चित करेपर्यंत वर्कर्स फेडरेशनचा संघर्ष सुरू राहणार:- कॉम्रेड मोहन शर्मा
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती-२०२४ ने सुरू केलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष भागीदारी करण्याचा निर्णय
वीज कंपन्यातील कोणत्याही कंत्राटी कामगारांनी ठेकेदारांना कमिशन म्हणून एक रुपया यापूढे सुद्धा देऊ नये
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरशनच्या अधिपत्याखाली असलेल्या कंत्राटी,आऊटसोर्सिंग, सुरक्षारक्षक व प्रगत प्रकल्पग्रस्त कामगार सेलचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक २५ फरवरी २०२४ रोजी खामगाव येथे संघटनेचे वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्माजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे कार्याध्यक्ष सी.एन.देशमुख, सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर,राज्य उपाध्यक्ष बी.एल. वानखेडे,ए.डी संगाडे,एस.आर. खतिब, राज्य खजिनदार अब्दुल सादिक,संयुक्त सचिव पी.व्ही.नायडू, शैलेश तायडे, आयाजखान पठाण,वीरेंद्र पाटील,पंडित कुमावत,कंत्राटी कामगार सेलचे सरचिटणीस एन. वाय.देशमुख, राज्यसचिव दत्ता पाटील,राज्य सहसचिव के. के.जलारे व्यासपीठावर उपस्थित होते.
![]() |
Advt. |
कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,कॉम्रेड ए.बी.बर्धन व दत्ता देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलित करून प्रचंड घोषणा देत झाली. बुलढाणा सर्कलच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वीज उद्योगात कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या कंत्राटी आऊटसोर्सिंग,सुरक्षारक्षक व वीज कामगारांना सभागृहाणे दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.कॉम्रेड एस.वाय.दुधाडे केंद्रीय सल्लागार यांचा विशेष सत्कार अध्यक्ष मोहन शर्माजी यांच्या हस्ते करण्यात आला. महावितरण मध्ये काम करताना अपघातात मृत्यू पावलेले कै.प्रमोद माणिकराव काकड यांच्या मातोश्री श्रीमती मंजुळाबाई काकड यांना बुलढाणा सर्कलच्या वतीने रु.१ लाख ३५ हजाराचा धनादेश मदत निधी म्हणून मान्यवरांच्या हस्ते दिला.
कॉमेड एन.वाय.देशमुख यांनी प्रास्ताविक करताना तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या व्यथा विस्तृतपणे मांडल्या व त्यावर मार्ग काढण्याकरीता वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन केले. कंत्राटी कामगाराचा राज्यातील नेतृत्व कॉम्रेड दत्ता पाटील,के.के. जलारे,अरुण दामोदर,बापू जावळे,नितीन शेंद्रे,संदीप टिळेकर इत्यादी पदाधिकारी यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्या संदर्भात विस्तृत भूमिका मांडली. कॉम्रेड अरुण दामोदर यांनी त्यांची संघटना वर्कर्स फेडरेशन संघटनेमध्ये विलीन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयाचे सभागृहाने प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत केले.संमेलनात कॉम्रेड शैलेश तायडे,अरुण मस्के यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
*कृष्णा भोयर* यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन सांगितले की, आज मी जो काही भाषण देतो ही वर्कर्स फेडरेशन संघटनेची देन आहे.विद्युत मंडळातील बेरोजगार अप्रेंटीसाचा संघर्ष सुरू असताना फेडरेशन संघटनेची ओळख झाली.त्या ओळखीतून मी या संघटनेकडे आकर्षिला गेलो, वयात संघटनेमुळे विद्युत मंडळात नोकरीवर लागलो व त्यानंतर आज पुढारी झालो. फेडरेशनच्या संघर्षामुळे हजारो अप्रेंटीसाना विद्युत मंडळ व आताच्या वीज कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला. भरतीवर बंदी असताना अनेक सहकारी संस्था स्थापन करून हजारो शिकाऊ उमेदवारांना फेडरेशन रोजगार मिळवून दिला.याच संघटनेने ३५००० रोजंदारी कामगारांना कायम करणे,मयत कामगाराच्या वारसांना विद्युत मंडळात सामावून घेणे,प्रकल्पग्रस्त,अप्रेंटिस व आताचे विद्युत सहाय्यक व इतर सहाय्यक यांना जागा निर्माण करून नोकरीवर लावण्याकरीता सतत संघर्ष केला. विद्युत मंडळ व वीज कंपन्यांचे खाजगीकरण होऊ नये म्हणून अनेक संपावर आंदोलन करणारी ही संघटना आहे.ही संघटना तत्वाशी तळजळ करत नाही,अन्यायग्रस्त कामगार, बेरोजगार याच्या करता सतत संघर्ष करते. पूर्वी ही संघटना बलाढ्य होती,आजही आहे व पुढे राहणार आहे. कारण या संघटनेचा विश्वास हा संघर्षावर आहे.कंत्राटी कामगाराचा प्रश्न सुटल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही.कंत्राटी कामगारांनी सुद्धा जागृत झाले पाहिजे आपण आमदार व खासदार निवडताना आपले प्रश्न घेऊन कोण लढतात त्यांनाच आपण मतदान केले पाहिजे. आऊटसोर्सिंग,सुरक्षारक्षक व प्रगत कुशल कामगार यांचा लढा येत्या काळात तीव्र करावा लागणार आहे.त्याकरीता सर्वांनी तयार राहावे असे आवाहन केले. केले.
*कॉम्रेड सी.एन.देशमुख* संबोधित करताना म्हणाले की,सर्वात शोषित कोणी कामगार असेल तर तो कंत्राटी कामगार आहे.या कामगारांसाठी संघर्ष करणे ही काळाची गरज आहे,या कामगारांचे शोषण राज्य सरकार व ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळत नाही.या श्रम करणाऱ्या कामगाराच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस नेहमीच असंघटित कामगारांसाठी रस्त्यावर संघर्ष करत आहे. त्यातील काही कामगाराना न्याय सुद्धा मिळवून दिलेलाआहे.यापुढेही या कामगाराच्या पाठीमागे खंबीरपणे संघटना उभी राहील असे आश्वासन त्यांनी दिले.कंत्राटी कामगारांची संघटना बांधण्याकरीता संघटनेच्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावे.केंद्र व राज्य सरकारचे धोरणे हे कामगार विरोधी असल्यामुळे त्या धोरणाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात कंत्राटी कामगारांनी सुद्धा भागीदारी करावी असे आवाहन त्यांनी केले.
*कॉम्रेड मोहन शर्माजी* संमेलनात संबोधित करताना म्हणाले की,वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून राज्य व वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या विरोधात संघर्ष सुरू केलेला आहे.या आंदोलनामुळे सरकारने श्री.मनोज रानडे व सौ.अनुराधा भाटिया कमिटीचे गठन केले होते. देशातील अनेक वीज कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यात आले.दि.४ जानेवारी २०२३ रोजी खाजगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिसुगृहा मध्ये मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी वीज कामगार संघटनां समवेत झालेल्या चर्चे दरम्यान कंत्राटी कामगारांना कसे सामावून घेता येईल याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना संघटनांना केली होती. ऊर्जामंत्री यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या वतीने कंत्राटी कामगारांना कसे सामावून घेता येईल याबाबतचा प्रस्ताव मा. देवेंद्रजी फडणवीस ऊर्जामंत्री यांना सादर केला.दोनदा ऊर्जामंत्री, एकदा प्रधान ऊर्जा सचिव,तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर ऊर्जा विभागाने कंत्राटी कामगाराच्या प्रश्नावर तिन्ही वीज कंपन्यांचे संचालक (मासं) व मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी यांची समिती गठीत केलेली आहे. संघटनेची मागणी आहे की, तातडीने संघटने समवेत चर्चा आयोजित करून कंत्राटी,आऊटसोर्सिंग कामगार,सुरक्षा रक्षक व प्रगत कुशल कामगार यांना सामावून घेण्याबाबत सन्माननीय तोडगा काढावा. सध्या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगाराच्या प्रश्नावर कृती समितीच्या आंदोलनामध्ये उद्यापासून भागीदारी करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.तसेच विज कंपन्यातील कंत्राटी व इतर कामगारांना सामावून घेण्याचे धोरण निश्चित करेपर्यंत वर्कर्स फेडरेशनचा सरकार व प्रशासना बरोबर संघर्ष सुरू राहील असेही जाहीर केले.
*खामगाव संमेलनात पारित करण्यात आलेले ठराव*
१) तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी,आऊटसोर्सिंग, सुरक्षा-रक्षक व प्रगत प्रकल्पग्रस्त कामगाराना तेलंगाना, तामिळनाडू,हिमाचल,ओरिसा इत्यादी वीज कंपन्यातील कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेतलेल्या प्रमाणे सेवेमध्ये सामावून घ्यावे.
२) पूर्वीच्या विद्युत मंडळातील रोजंदारी कामगारांना जसे सामावून घेतले.त्या पद्धतीने रोजंदारी कामगार म्हणून बिना अट सेवा जेष्ठतेनुसार सामावून घ्यावे.
३) तिन्ही वीज कंपन्यातील कामगारांना जोपर्यंत सामावून घेण्यात येत नाही.तोपर्यंत ६० वर्ष नोकरीची हमी द्यावी. ठोस कारणाशिवाय कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये.
४) तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी तयार करून तिन्ही कंपन्यांच्या पोर्टलवर प्रसिद्ध करावी.
५) राज्य सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनामध्ये ४० टक्के वाढ करावी.
६) सध्या वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना (जुन्या व नव्या) एकसमान वेतन देण्यात येते.कामगारांना वेतन देताना जेवढे वर्ष सर्विस झाली,त्याचा विचार करून वेतन निश्चित करावे.
७) नवीन भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना वयोमर्यादित व शैक्षणिक पात्रतेत सूट देऊन प्राधान्याने सामावून घेण्याचे नियम तयार करावे.
८) कंत्राटी कामगारांना एकदा कंत्राटी कामगारांनी वेतन दिल्यानंतर कोणत्याही कंत्राटी कामगारांनी एक रुपया सुद्धा कंत्रालदारात परत देऊ नये.
९) कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना रु.४ लाख नुकभरपाई देण्याबाबतच्या आदेशात सुधारणा करून रु.२० लाख देण्यात यावे.
१०) सर्व कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.ची सुविधा उपलब्ध करून देऊन ई-ओळखपत्र देणे कंत्राटदारास बंधनकारक करावे.
११) अपघातात मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे.
१२) मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारास जोपर्यंत पेन्शन सुरू होत नाही.तोपर्यंत सर्व जबाबदारी कंत्राट दारावर निश्चित करावी.
१३) तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी,आऊट-सोर्सिग, कामगार,सुरक्षा रक्षक व प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त यांना रु.५१५ भरून कल्याण निधी ट्रस्ट सभासद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१४) सुरक्षा रक्षकाची स्वतंत्र संघटना निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१५) कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार स्वतंत्र संघटनेचे रजिस्ट्रेशन केल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष-, उपाध्यक्ष-२,सचिव-१,सहसचिव-२,संघटक-२,कोषाध्यक्ष-१, महिला प्रतिनिधी-२ व प्रसिद्ध प्रमुख -१ अशी कार्यकारणी तात्काळ सर्कल सचिव यांनी बैठका घेऊन जिल्ह्याची जाहीर करावी असा ठराव पास करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलढाणा सर्कलचे सर्कल सचिव कॉम्रेड मंगेश कानडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कॉम्रेड देशमुख केंद्रीय कार्यकारी सदस्य यांनी केले. या संमेलनाकरीता राज्यभरातील हजारो कामगार हजर होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने,भारत माता का जय जयघोषाने झाली.संमेलनाच्या शेवटी प्रचंड घोषणा देत संमेलनाची समाप्ती झाली.कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था,भोजन हे अकोला झोन मधील पदाधिकारी यांनी केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव पास करण्यात आला
إرسال تعليق