शिवजयंतीदिनी रोटरी क्लबचे अखिल भारतीय कवी सम्मेलन संपन्न

कवींनी केले खामगाव करांचे मनोरंजन

सुपरिचित स्वयंसेवी संगठन रोटरी क्लब खामगांवतर्फे रोटरी गतीमंद विद्यालय व रोटरी इंग्लिश स्कुल आणि इतर समाजपयोगी कार्याच्या सहाय्यार्थ १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानीक जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालयाच्या भव्य प्रांगणात अखिल भारतीय कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यातून प्राप्त झालेले उत्पन्न गतीमंद मुलांचे शिक्षणाकरीता व विद्यार्थ्यांचे व्होकेशनल प्रशिक्षणाकरीता आणि त्यांना त्यांचे पायावर उभे करण्यास मदत करण्याकरीता वापरण्यांत येईल. 

जाहिरात फक्त 100 रू

रोटरी कविसम्मेलनात राष्ट्रीय स्तरावर विख्यात वीर/हास्य/श्रृंगार रस कवी शशिकांत यादव, गीतकार प्रियांशु गजेन्द्र, श्रृंगार रस कवयित्री सोनल जैन, हास्य व्यंग कवी दिनेश देसी घी आणि हास्य व्यंग कवी हिमांशु बवंडर यांनी श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपली उपस्थिती लावली. एकाहून एक सुंदर अशा हास्यरस, शृंगाररस आणि वीर रसाच्या रचना त्यांनी सादर केल्यात आणि खामगांवकरांची मने जिंकली.


उद्घाटन समारंभाच्या वेळेस मंचावर सर्व कवींसोबत क्लब अध्यक्ष सुरेश पारीक, सचिव आनंद शर्मा व प्रकल्पप्रमुख विजय मोदी उपस्थित होते. दीप-प्रज्वलनाने व सरस्वती पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. तसेच उपस्थित प्रायोजकांचे प्रतिनिधी, निमंत्रित अतिथी व मान्यवरांचे स्वागत क्लबतर्फे रोटरी सदस्यांसोबत रोटरी गतीमंद स्कुलच्या विद्यार्थ्याच्या हस्ते पुष्पगुच्छाद्वारे करण्यात आले आणि असे करून रोटरीने एक नवीन पायंडा पाडला. रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश पारीक यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले तर प्रकल्पप्रमुख विजय मोदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मनोरंजनासोबत वंचितांची समाजसेवा घडावी हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल सचिव आनंद शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले. या उद्घाटन सत्राचे संचालन राजीव नथानी व श्रुती नथानी यांनी केले.


प्रवेश करतांना सर्वांना पाण्याची बाटली आणि सर्व उपस्थितांकरिता फूड झोनमध्ये नि:शुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सरस्वती शिशु मंदिराच्या भव्य प्रांगणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्कींगची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे सर्वसामान्य वाहतुकीस कुठेही अडथळा उत्पन्न झाला नाही. या कार्यक्रमाकरीता शेगांव, अकोला, अमरावती, जालना, चिखली, नांदुरा, मलकापुर या ठिकाणांहून देखील रसिकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती.   

कविसम्मेलन संस्मरणीय ठरावे याकरीता रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश पारीक, सचिव आनंद शर्मा व प्रकल्पप्रमुख विजय मोदी, रितेश केडिया, आशिष पटेल, वैभव गोयनका यांचेसह सर्व रोटरी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. येणाऱ्या वर्षभर ही साहित्यिक मेजवानी पुरेल अशा गोड स्मृती घेऊन सर्वजण आपापल्या घरी परतले.

Post a Comment

أحدث أقدم