घरकुलाचे चेक काढण्यासाठी लाभार्थ्याला मागितले 20 हजार
शेगाव न.प. मधील दोन कंत्राटी कर्मचारी अडकले ACB च्या जाळ्यात
शेगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) - पंतप्रधान आवास योजनेचे थकलेल्या पैशाचे चेक काढण्यासाठी लाभार्थ्याला 20 हजाराची लाच मागणाऱ्या शेगाव नगर परिषदेतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई 23 फेब्रुवारी रोजी दुपारी शेगाव-जानोरी मार्गावरील राजेश्वर कॉलनीजवळील रस्त्यावर उघडकीस आली. या कारवाईमुळे शेगाव नगर परिषदेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
शेगाव नगर पालिकेतील पंतप्रधान आवाज योजनेच्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले आकाश भोज व संदेश पोहोरकार हे दोघेही कंत्राटी पध्दतीने याठिकाणी कर्तव्यावर आहेत. दरम्यान शहरातील एका लाभार्थ्याने कार्यालयात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे अनुदानाचे चेक मिळविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र लाभार्थ्याला चेक काढण्यास सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध कारणे समोर करून टाळाटाळ केली जात होती. दरम्यान उपरोक्त दोघे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सदर लाभार्थ्याला चेक काढून देण्याकरीता 20 हजाराची लाच मागितली. लाभार्थी अगोदरच गरीब असून पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधकाम करीत आहे. त्यामुळे मंजूर झालेले घरकुलाचे पैसे मिळविण्यासाठी लाच का द्यायची म्हणून लाभार्थ्याने याबाबत थेट बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंध कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून 23 फेबु्रवारी रोजी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दुपारी सापळा कारवाई रचून शेगाव-जानोरी मार्गावरील राजेश्वर कॉलनीजवळील रस्त्यावर आकाश भोज व संदेश पोहोरकार या दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभार्थ्याकडून लाच घेतांना रंगेहाथ पकडले. पथकाने उपरोक्त दोघांकडून लाचेची रक्कम जप्त केली असून दोघांना ताब्यात घेवून शासकिय विश्राम भवन येथे घेवून गेले. वृत्त लिहेपर्यंत दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
إرسال تعليق