खामगाव :- बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. देऊळगाव राजा येथील बस स्थानकात उभी असलेली एसटी बस अज्ञाताने चोरून नेली होती. याबाबत एसटी बस चालकाकडून पोलीसात तक्रार देण्यात आल्याचे कळते. सध्या बसचा शोध लागला आहे, मात्र ही बस कुणी आणि का पळवली याबाबत मात्र कमालीची गोपनीयता राखण्यात येतेय
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव (Buldhana) राजा बस स्थानकात मुक्कामी बस उभी करून बसचे चालक आणि वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते. यावेळी त्याची MH 07 C 9273 या क्रमांकाची मानव विकास मिशनची बस (ST Bus) अज्ञाताने बस स्टँड आवारातून गायब केली. याबाबत एसटी बसच्या चालकाने देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिली. हे प्रकरण समोर आल्यावर एकच खळबळ उडाली.
मात्र, सदर बस अज्ञाताने सुरू करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळला. त्यामुळे नादुरुस्त अवस्थेत ही बस रस्त्यात उभी करून अज्ञाताने पोबारा केला आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशीवर ठेवलं आहे. मात्र या बाबतीत एसटी कर्मचारी आणि पोलीस काहीही माहिती देण्यास तयार नाहीत.
जनोपचार the real news
إرسال تعليق