सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला; जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने
![]() |
Mumbai : (विक्रमकुमार थानवी)जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून निदर्शने केली. हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी सर्व पत्रकार संघटनानी केला असून,सरकारने विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा यापुढील आंदोलन राज्यात तीव्र करू असा इशारा दिला. विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, यासाठी लवकरच पत्रकार संघटनांच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबईतील आझाद मैदान जवळ असलेल्या मराठी पत्रकार संघाच्या आवारातून रॅली काढत पत्रकारांनी निषेध व्यक्त करत आपली भूमिका मांडली. मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ , मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق