रोटरी फौंडेशनला सढळहस्ते १०० कोटी दान देणारे श्री रविशंकरजी डाकोजु यांची रोटरी क्लब खामगांवला सदिच्छा भेट
रोटरी फौंडेशन संपूर्ण विश्वभरात अनेक क्षेत्रात कार्य करते जसे की आरोग्य सुधारणे, जगातील पोलिओचे समूळ उच्चाटन करणे, शिक्षण प्रदान करणे, गरिबीचे उच्चाटन करणे, शांततेचा प्रचार करणे, पर्यावरण सुधारणे, स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे वगैरे. परंतु यासाठी प्रचंड प्रमाणात अर्थसाहाय्याची आवश्यकता असते आणि जगभरातील दानशूर मंडळी यासाठी हजारो-लाखो रुपये सढळ हस्ते दान करतात कारण त्यांना याची जाण असते की रोटरीला दिलेला पैसा हा सत्कारणी लागतो परंतु बेंगळुरू स्थित एक असा अवलिया आहे की ज्याने २०१८ साली थोडेथोडके नव्हे तर १०० करोड रुपये रोटरी फौंडेशनला दान दिलेत. त्यांचे नांव आहे श्री रविशंकरजी डाकोजु.
सर्व भारतीयांसाठी कौतुकाची बाब ही आहे की एवढी प्रचंड रक्कम दान करणारे ते एकमेव भारतीय तर आहेच परंतु संपूर्ण जगात त्यांच्यापेक्षा जास्त डोनेशन केवळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनीच दिलेले आहे. एक रोटेरियन म्हणून त्यांच्या सेवाकार्याचे विस्तारीकरण सामुदायिक विकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिक व अनाथांचे संगोपन, वृक्षारोपण, प्राणी कल्याण, तलाव पुनरुज्जीवन आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना आधार या क्षेत्रातही झालेले आहे. मणिपूर आणि मिझोराम सारख्या दुर्लक्षित क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे तेथील लोकं त्यांना देवता मानतात.
तर अशा या महान व्यक्तीचे रविवारी शेगांव येथे एका खाजगी कार्यासाठी येणे झालेले आहे असे कळाल्यानंतर रोटरी क्लब खामगांवने त्यांना भेट देण्यासाठी आमंत्रित केले असता व माजी प्रांताध्यक्ष डॉ आनंद झुनझुनवाला यांच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या व्यस्ततम वेळेतून वेळ काढून खामगांवला सुमारे दोन तासांसाठी भेट दिली. स्थानिक मोहता महिला विद्यालयात घेण्यात आलेला एका छोटेखानी समारंभात क्लब अध्यक्ष विजय पटेल आणि मानद सचिव किशन मोहता यांनी त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. त्यांच्या साधेपणाचा प्रत्यय त्यावेळेस आला ज्यावेळेस त्यांनी मंचावर बसण्यास नकार देऊन सर्व रोटरी सदस्यांसोबत खाली खुर्चीवर बसणे पसंत केले. चहादेखील त्यांनी छोट्या कागदी कपात घेतला. आपले अनुभव सर्वांसोबत त्यांनी शेअर केले आणि चांगल्या कार्याला दान करण्यासाठी कधीही हात आखडता घेऊ नये असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब अध्यक्ष विजय पटेल यांनी केले तर त्यांचा परिचय सीए उमेश अग्रवाल यांनी सभेस करून दिला. कार्यक्रमाचे संचालन आपल्या रसाळ वाणीत श्रुती नथाणी यांनी केले. आभार प्रदर्शन क्लब मानद सचिव किशन मोहता यांनी केले. अचानक ठरलेल्या या कार्यक्रमाला एका व्हाट्सअँप मेसेजवरून सुमारे ६० सदस्यांनी हजेरी लावली. एका छोट्या गावातील रोटरी क्लबला औदार्याने एवढ्या मोठ्या असलेल्या माणसाने भेट देऊन खामगांव क्लबने केलेल्या कार्याची प्रशंसा केल्याबद्दलचे समाधान सर्व रोटरी सदस्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
إرسال تعليق