आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश


मुंबई (जनोपचार)26 डिसेंबर 2024: मंत्रालयात कामगार मंत्री म्हणून श्री आकाश फुंडकर यांनी पदभार स्वीकारला. यानंतर लगेचच त्यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त करत तातडीने ॲक्शन मोडमध्ये कार्य सुरू केले.

श्री. फुंडकर यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या सुरक्षितता, कल्याण आणि जीवनमान उंचावण्यासाठी सरकारची सर्व शक्यतो साधने वापरली जातील. त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे राज्यातील कामगारांसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे.

श्री. फुंडकर यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयांतर्गत येणाऱ्या धोकादायक आणि अतिधोकादायक कारखान्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. "अपघातानंतर आर्थिक मदत महत्त्वाची असली तरी कामगारांचा जीव वाचवणे प्राधान्य असावे," असे सांगून त्यांनी सर्वेक्षणानंतरही अपघात झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.


माथाडी कामगारांची नोंदणी वाढवण्यासंदर्भात कार्यवाही करणे आणि माथाडी कामगार संहिता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे माथाडी कामगारांना अधिक सुविधा आणि संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.कार्यभार स्वीकारल्यानंतर आयोजित बैठकीत श्री. फुंडकर यांनी असंघटित कामगार, श्रम व रोजगार मंत्रालयाच्या ई-श्रम पोर्टल, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्याशी संबंधित कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

त्यांनी सांगितले की, असंघटित कामगारांसाठी विशेष योजना आखण्यात येतील, तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या माध्यमातून कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील.


बैठकीला विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक दिलीप पोफळे, संचालक ध.प्र. अंतापूरकर, बांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळाचे विवेक कुंभार यांसह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले गेले.



Post a Comment

أحدث أقدم