कसली सुरक्षा अन कसलं काय ..?

एसटी बसची बस स्टॅन्ड आवारातच इसमाला धडक: वाडी येथील माजी सरपंचाचा मृत्यू

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- एसटी बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवून 55 वर्षीय इसमाला धडक दिली. ही घटना आज 22 ऑक्टोंबर रोजी खामगाव बस स्थानक परिसरातच घडली. या घटनेमुळे एसटी ची कसली सुरक्षा आणि कसलं काय अशी चर्चा होत आहे. सदर इसमाचा मागील चाकाखाली दबून मृत्यू झाल्याचे समजते. मृतक प्रकाश ठाकरे हे वाडी येथील माजी सरपंच होते.


याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बसचालक तात्याराव शेषराव देशमुख रा. बोरी अडगाव ता. खामगाव यांनी त्यांचे ताब्यातील बस क्र. एम.एच.४० एल ९६६६ ही बस बसस्टँडच्या आवारात निष्काळजीपणे चालवली. यामध्ये वाडी येथील माजी सरपंच प्रकाश किसन ठाकरे यांना धडक दिल्याने ते मागील चाकाखाली दबून जखमी झाले. यावेळी त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मृतकाचा मुलगा अंकुश ठाकरे यांनी दिलेल्या फियादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी बसचालक तात्याराव शेषराव देशमुख यांचेविरुध्द कलम १०६ (१) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय मोहन करुटले करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم