शिक्षिकेवरील गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार
शिक्षिके विरुद्धचा खटला खामगाव न्यायालयात पुढे सुरूच राहणार
नागपूर : एका शिक्षिकेवरील गुन्हा रद्द करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. आरोपी शिक्षिके वर खटला दाखल करण्याच्या खामगाव प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते.
आरोपी शिक्षिकेने एका प्रकरणात माजी सैनिक गुलाबराव वानखडे (७७, रा. अमडापूर) यांच्याविरुद्ध मानहानिकारक आरोप केला होता. याबाबत वानखडे यांनी या शिक्षिकेविरुद्ध न्यायालयात धाव घेऊन प्रकरण दाखल केले. यामध्ये खामगाव प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपी शिक्षिकेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ५०० नुसार मानहानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध आधी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, खामगाव येथे आरोपी शिक्षिकेकडून रिव्हिजन पिटीशन दाखल करण्यात आली. परंतु सत्र न्यायालयाने शिक्षिकेविरुद्ध दाखल खटला वैध, योग्य व अचूक आहे,
असा निष्कर्ष नोंदवत आरोपी शिक्षिकेची रिव्हिजन पिटीशन खारीज केली. त्यानंतर संबंधित शिक्षिकेने खामगाव येथील दोन्ही न्यायालयांच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. परंतु हायकोर्टाच्या एकल बेंचचे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी दिलेल्या आदेशात याचिकाकर्तीन या आधी माजी सैनिकाच्या मुलावर अत्याचाराचा आरोप करत खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता, तो हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने रद्द केला यासह इतर निरीक्षणे नोंदवित, खामगाव येथील न्यायालयाने दिलेले निर्णय न्यायसंगत असून याचिकाकर्तीवर दाखल मानहानीचा फौजदारी खटला योग्यच आहे, असा निर्णय दिला. त्यामुळे आरोपी शिक्षिकेची रिट पिटीशन नामंजूर केली आहे. आरोपी शिक्षिके विरुद्धचा खटला खामगाव न्यायालयात पुढे सुरूच राहणार आहे.
या प्रकरणात ज्येष्ठ माजी सैनिक गुलाबराव वानखडे यांच्या वतीने खामगाव येथील न्यायालयात अॅड. दीपक साठे बाजू मांडत आहेत. तर हायकोर्टात अॅड. स्वप्निल वानखडे यांनी बाजू मांडली.
إرسال تعليق