यत्न तोचि देव जाणावा

  पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या राष्ट्रीय खेळाडू कु. प्रियंका व कु. क्षमा यांचे विद्यार्थिनींना संदेश 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-स्थानिक श्रीमती सु.रा.मोहता महिला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी खामगावची नॅशनल कबड्डी मानांकित कु. प्रियंका प्रकाश काळे व शेगाव तालुक्यातील चिंचखेडची  कु. क्षमा विठ्ठल भांबेरे यांची नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोषित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी  निवड तसेच कु .रूपाली कैलास गावडे हिची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे तसेच खेळ व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित एक कौतुकाची थाप सत्कार समारंभ  तसेच महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थिनींसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. स्वाती चांदे यांनी महाविद्यालयासाठी विद्यार्थीनींची झालेली निवड ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .या तीघी हिरकण्यांनी खेड्यातील मुलींना यशाचा मार्ग दाखवून दिला आहे . मुलींनी आम्ही खेड्यात राहतो हा न्युनगंड न बाळगता या मार्गाने मार्गक्रमण करावे ,असे अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना आव्हान केले. कु. प्रियंका हिने विद्यार्थिनींना आपल्या आई-वडिलांचे कष्टाचा चीज करा .आपल्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असतो .मला खेळांनी मोठं केलं. खेळामुळे माझी निवड झाली. हे निर्विवाद सत्य आहे.असे सत्काराप्रसंगी  संबोधित केले.कु. क्षमा विठ्ठल भांबेरे हिला खेळाचा तीळ मात्र गंध नसलेल्या परंतु  खेळ किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती आलेल्या, वयाच्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरवलेल्या, खडतर आर्थिक परिस्थितीतून  मार्गक्रमण करून मिळवलेल्या यशाची गाथा प्रस्तुत करताना ,मैत्रिणींनो  वेळेचे भान ठेवून आत्तापासूनच आपले टार्गेट ठरवा व ते मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील रहा.

  खडतर प्रयत्न करूनही यश मिळत नाही .मला खूप उशीरा मिळाल परंतु मागे हटू नका. एकदा उचललेलं एक पाऊलही खूप काही बदल घडवू शकतो. हा माझ्यासाठी घडलेला बदल, सकारात्मकतेची एक नवी वाट ,मला खूप काही देऊन गेली. तुम्ही सुद्धा प्रयत्नांची कास धरा ,असे  कळकळीचे आव्हान तिने केले. यशस्वी पाल्यांसोबत आलेल्या पालकांचा सुद्धा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या विद्यार्थिनींच्या यशाने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. विद्यार्थिनींना यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून या विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमाचे आयोजन खेळ व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ.सीमा देशमुख यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद  व शिक्षकेतर कर्मचारी वृंद  हजर होते 


Post a Comment

أحدث أقدم