घटत्या विद्यार्थी संख्येबाबत उपाययोजना करा : संजय रामगिरवार
चंद्रपूर गोंडवाना विद्यापीठातील घटती विद्यार्थी संख्या व दर्जेदार शिक्षणाविषयी तीव्र चिंता व्यक्त करणारा प्रस्ताव २४ मार्च रोजी पार पडलेल्या अधिसभेत सिनेट सदस्य संजय रामगिरवार यांनी मांडला. त्यावर अवघ्या सभागृहाने गंभीर चर्चा करीत, ही परिस्थिती कायम राहिली तर विद्यापीठाच्या अस्तित्वालाच धोका आहे, असे मत मांडले. झपाट्याने घटणाऱ्या विद्यार्थी संख्येबाबत आणि दर्जेदार शिक्षणाबाबत उपाययोजना तयार करून त्याची अंमलबजावणी करावी यासाठी एक उच्चस्तरिय समिती यावेळी गठित करण्यात आली. २०१८-१९ ला चंद्रपूर येथील काही अभियांत्रिकी महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाची संलग्नता सोडून 'बाटू'ला जुळल्याने आधीच कमी झालेली विद्यार्थी संख्या गेल्या काही वर्षांत आणखी घटत चालली आहे. येत्या काळात एसएनडीटी विद्यापीठाचे मोठे आव्हान कायम आहे. चंद्रपूरच्या एफईएस महाविद्यालयातील मुलींची एक तुकडी आताच कमी झाली. हे त्याचेच द्योतक आहे. यावर गंभीर चिंतन करण्याची वेळ आली आहे. विद्यापीठ कॅम्पस तसेच संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वर्गात बसतात का, यावरही चिंता व्यक्त करण्यासारखी स्थिती आहे. या समस्येवर आताच उपाय शोधला नाही तर येत्या काळात गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल आणि म्हणून यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, असे मत रामगिरवार यांनी व्यक्त केले.
إرسال تعليق