रोटरी क्लब खामगांवला प्रांतपाल राजिंदरसिंह खुराणा यांची औपचारिक भेट संपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : रोटरी क्लब खामगांव हे आंतरराष्ट्रीय रोटरी डिस्ट्रीक्ट-३०३० अंतर्गत कार्य करते ज्याचे कार्यक्षेत्र नागपुर ते नाशिक दरम्यान १६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत १०२ क्लब्जपर्यंत पसरलेले आहे. प्रांतपाल (डिस्ट्रीक्ट गव्हर्नर) यांची प्रत्येक क्लबला वर्षातून एक  औपचारिक भेट आवश्यक असते, ज्यादरम्यान ते त्या क्लबची कार्यप्रणाली आणि त्यांनी घेतलेल्या प्रकल्पांबद्दल जाणून घेतात, योग्य मार्गदर्शन करतात आणि चांगल्या कार्याबद्दल कौतुकाची थापदेखील देतात. रोटरी क्लब खामगांवला प्रांतपाल राजिंदरसिंह खुराणा यांची अशीच एक औपचारिक भेट रविवार १६ मार्च रोजी संपन्न झाली.

सकाळी ९ वाजता त्यांचे नागपुर येथून कार्यस्थळ अग्रसेन भवन खामगांवला आगमन झाले. त्यावेळेस त्यांचे भावपूर्ण स्वागत क्लब अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळेस त्यांचे समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गिन्नी खुराणा आणि सहायक प्रांतपाल डॉ दिलीप भुतडा (शेगांव) हे उपस्थित होते. प्रांतपाल यांच्या आगमनाप्रित्यर्थ रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये २६  युनिट्स रक्त संकलित झाले. याच ठिकाणी प्रांतपाल राजिंदरसिंह खुराणा यांनी अनुक्रमे इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लब यांची बैठक घेतली आणि त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले. रोटरीचे वरिष्ठ सदस्य प्रमोद अग्रवाल यांना रोटरी- रोटरॅक्ट यांचा गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट समन्वय साध्य केल्याबद्दल “रोटरॅक्ट रत्न” या पुरस्काराने प्रान्तपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

त्यानंतर रोटरी क्लब खामगांवद्वारे चालविण्यात येणा-या किंवा त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असणा-या काही मोजक्या प्रकल्पांना प्रांतपाल यांची भेट घडवून आणण्यात आली आणि तेथील कार्याबद्दल संबंधित पदाधिका-यांद्वारे त्यांना माहिती देण्यात आली जसे की रोटरी गतिमंद विद्यालय, रोटरी स्कूल, लांजूड येथील गौरक्षण संस्थानात रोटरीच्या निधीतून प्रत्येकी ९० लक्ष लिटर्सच्या २ शेततळ्यांचे सुरु असलेले खोदकाम, रोटरीचे एमआयडीसीतील वृक्षारोपण प्रकल्प, जनुना तलाव आणि इतर क्षेत्रातील वनराई प्रकल्प, मुकबधीर विद्यालय इत्यादि. खामगांव रोटरी क्लबच्या कार्याची इतकी प्रचंड व्याप्ती बघता प्रांतपाल यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि भरपूर कौतुक केले. भोजनानंतर त्यांनी क्लब पदाधिकारी, येणाऱ्या २ वर्षातील अध्यक्ष व मानद सचिव आणि सर्वसाधारण सदस्य यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान अग्रसेन भवन येथे एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस त्यांचे समवेत डिस्ट्रीक्ट सचिव डॉ जुगल चिराणीया (अकोला), सहायक प्रांतपाल डॉ दिलीप भुतडा (शेगांव), माजी प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला आणि माजी सहायक प्रांतपाल अनिरुद्ध पालडीवाल हे उपस्थित होते. राष्ट्रगीत, दीप प्रज्वलन आणि रोटरी आद्यपुरुष पॉल हॅरिस यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे पुष्पसुमनांनी स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लब अध्यक्ष विजय पटेल यांनी केले. मानद सचिव किशन मोहता यांनी वर्षभरात ज्या सदस्यांनी रोटरीमध्ये किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, त्यांचा उल्लेख करून त्यांचे प्रांतपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळेस रोटरीने आपल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणा-या महिलांसाठी प्रथमच “रोटरी नारी रत्न” पुरस्काराची सुरुवात केली आणि सर्वानुमते प्रथम मानकरी विकमशी फॅब्रिक्सच्या प्रबंधन संचालिका श्रीमती गीतिका विकमशी ठरल्या. त्याचप्रमाणे “व्होकेशनल अवॉर्ड” अंतर्गत श्रीगणेश कोचिंग क्लासेसचे संचालक श्री विपुल चांडक हे सत्काराचे मानकरी ठरले. तसेच श्री सतीश भट्टड यांनी आपला २५ वर्षांचा सलग रोटरी कार्यकाल पूर्ण केला. या तिघांच्या कार्याचा लेखाजोखा सनदी लेखापाल उमेश अग्रवाल यांनी सभेस करून दिला आणि सर्वांना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह प्रदान करून सहपरिवार गौरवान्वित करण्यात आले.

कार्यक्रमात पुढे सहायक प्रांतपाल डॉ दिलीप भुतडा यांनी प्रांतपाल राजिंदरसिंह खुराणा यांचा जीवन परिचय सभेस करून दिला. आपल्या मार्गदर्शनात प्रांतपाल यांनी रोटरीच्या नवीन योजना, नवीन धोरणे, काही नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि खामगांव क्लबकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. सरतेशेवटी खामगांव क्लबचे रेकॉर्ड कीपिंग चांगले असून हा क्लब अतिशय उत्कृष्ट आणि एकसंघाने कार्य करीत आहे आणि म्हणून यांना संपूर्ण डिस्ट्रीक्ट-३०३० मध्ये खूप मानाचा दर्जा आहे असे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाचे सुरेल संचालन सनदी लेखापाल अपूर्व देशपांडे यांनी केले तर त्यांना नकुल अग्रवाल, सुशांतराज घवाळकर आणि केवल मोहता यांनी साहाय्य केले. आभार प्रदर्शनाची महत्वपूर्ण जबाबदारी नकुल अग्रवाल यांनी पार पाडली. दिवसभरातील वेगवेगळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले. स्वरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. वर्षभर केलेल्या आपल्या कार्याचे योग्य मूल्यमापन वरीष्ठांद्वारे झाल्याचे समाधान सर्व सदस्यांच्या चेहऱ्यांवर विलास होते.

Post a Comment

أحدث أقدم