सुसाट पल्सर झाडावर आदळली तीन युवक जागीच ठार

बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क -ट्रीपल सीट सुसाट वेगात जात असलेली पल्सर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. चिखली ते जाफराबाद मार्गावर भोकर पळसखेड दरम्यान काल २५ मार्चच्या दुपारी दोन वाजता ही दुर्घटना घडली.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यात येणाऱ्या पिंपरीचे रहिवासी असलेले रोहित महादू चाबूकस्वार (२४), शुभम रमेश चाबूकस्वार व सोनू सुपडू उसरे (२३) हे तरुण एमएच-१५-०८५७क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने कुंभारीकडे निघाले होते. चिखली शहराकडे येत असताना भोकर ते पळसखेडदरम्यान भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. दुचाकी झाडावर धडकल्याने रोहित, शुभम व सोनू यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. चिखली पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अपघातात तीन तरुण दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वाहनांच्या वाढत्या वेगाबद्दल चिंता व्यक्त केली. रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकाचवेळी गावातील तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता समजताच सिल्लोड तालुक्यातील पिंपरी गावावर शोककळा पसरली.

Post a Comment

أحدث أقدم