कामगार मंत्री ना आकाश फुंडकर यांनी घेतली तातडीची बैठक आणि म्हणाले टक्कल संबंधी त्वचाविकार आढळलेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घ्या 

फंगल इन्फेक्शन आणि त्वचाविकार टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ आणि उकळलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. आंघोळीकरिता आणि इतर वापरासाठीही केवळ स्वच्छ पाणीच वापरावे. त्वचेवर कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत. शरीर आणि पाय कोरडे व स्वच्छ ठेवावेत तसेच ओलसर कपडे वापरणे टाळून नेहमी स्वच्छ आणि कोरडे कपडे घालावेत.

शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळती आणि त्वचेवर फंगल इन्फेक्शनसारख्या त्रासांचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला या त्रासांमागे पाण्याच्या दूषिततेचा कारणभाव असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर *नामदार श्री आकाश फुंडकर कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार  दि. १० जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्राम भवन खामगांव येथे तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत पाण्याच्या दूषिततेमुळे हा त्रास होत आहे की फंगल इन्फेक्शनमुळे होत आहे, याची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, आवश्यकता भासल्यास रुग्णांचे रक्ताचे नमुने त्वरित घेऊन तपासणी करावी आणि याबाबत कोणतीही दिरंगाई केली जाऊ नये, *असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत*. जे रुग्ण आढळले आहेत, त्यांची योग्य ती काळजी घ्यावी आणि नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. लवकरच यासंदर्भातील कारणे आणि उपाययोजना समोर येतील.

कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुरजीरा आणि निंबी  या गावांमध्ये त्वचाविकारांचे रुग्ण आढळले आहेत. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी वापरण्यास सुरक्षित नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून, पाण्यात नायट्रेट आणि TDS चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अशा पाण्याचा पिण्यासाठी व इतर वापरासाठी टाळण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासन आणि वैद्यकीय पथकांनी बाधित गावांना भेट देत त्वचेच्या संसर्गाची तपासणी केली असून, तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाण्यातील आर्सेनिक आणि लीड यांसारख्या घटकांची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने बुलढाणा आणि नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

वारी हनुमान धरणातील पाणी तपासणीत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी धरणातील पाणी वापरण्यास प्राधान्य द्यावे. याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


या परिस्थितीवर *नामदार आकाश फुंडकर यांनी प्रशासनाला  "ज्या रुग्णांमध्ये त्वचाविकार आढळले आहेत, त्यांची योग्य ती काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.  नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. लवकरच या परिस्थितीचे नेमके कारण आणि उपाययोजना समोर येतील. आम्ही नागरिकांच्या आरोग्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल."


या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, शेगाव आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली बाहेकर, खामगाव आरोग्य अधिकारी डॉ. खंडारे आणि खामगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم