प्रतिष्ठेचा खामगाव रत्न पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना तर खामगाव गौरव संत निरंकारी मंडळाला जाहीर
खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी होणार सन्मान
खामगाव - खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना तर खामगाव गौरव हा पुरस्कार संत निरंकारी मंडळ, शाखा खामगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
खामगाव प्रेस क्लब खामगाव कडून शहराचा नावलौकीक वाढविणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी खामगाव रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात येते. तसेच शहरात व ग्रामीण भागात समाजसेवेचा वसा घेवून जी संस्था निस्वार्थ सेवाकार्य करते अशा संस्थेला खामगाव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोबतच पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवास स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार व युवा पत्रकारांना प्रेरणा मिळावी यासाठी युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते.
अनेक क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आल्यानंतर यावर्षी खामगाव रत्न या पुरस्कारासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून खामगाव शहराचे नाव राज्य पातळीवर पोहचविणारे ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांचे नाव पत्रकारांच्या वतीने ठरविण्यात आले असुन खामगाव रत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. सोबतच प.पु.बाबा बुटासिंहजी महाराज यांनी १९२९ रोजी स्थापन केलेल्या आध्यात्मिक प्रबोधनाव्दारे ईश्वरप्राप्ती करून मानव एकता व विश्व बंधुत्वाचा प्रचार करण्यासाठी स्थापन केलेल्या संत निरंकारी मंडळ खामगाव शाखेला यंदाचा खामगाव गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही संस्था मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा हा एकमेव मानव कल्याणाचा संकल्प घेवून सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वननेस वन, अमृत प्रोजेक्ट, नैसर्गिक आपत्ती यासह अनेक क्षेत्रात काम करते.
स्थानिक ग्रामीण पोलिस स्टेशनच्या बाजूला असलेल्या पत्रकार भवन येथे ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे कामगार मंत्री नामदार ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समिती सदस्य अशोक सोनोने, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनिल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शहरातील सर्व पत्रकार बांधव, प्रतिष्ठीत नागरिक, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन खामगाव प्रेस क्लब, खामगावच्या वतीने करण्यात आले आहे
إرسال تعليق