उमेद अभियानाच्या सरस प्रदर्शनाचे पालकमंत्री मा. ना. आकाश फुंडकर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
अकोला (जनोपचार न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान 'उमेद'च्या वतीने आयोजित भव्य सरस प्रदर्शन व वऱ्हाडी जत्रेचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री मा. ना. आकाश फुंडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. हे प्रदर्शन 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अकोल्यात आयोजित करण्यात आले असून, शेकडो महिला बचत गटांनी आपली विविध उत्पादने या प्रदर्शनात मांडली आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. ना. आकाश फुंडकर यांनी महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवून व्यवसायात प्रगती साधावी, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की शासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, या गटांना दीर्घकालीन स्थिर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल. महिला बचत गट हे ग्रामीण विकासाच्या कणखर पायाभरणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्वावलंबी महिलांची मोठी अर्थिक शक्ती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भव्य उद्घाटन कार्यक्रमात माननीय आमदार रणधीर सावरकर, माननीय आमदार अमोल मिटकरी, माननीय आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आणि महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने उपस्थित होते. आपल्या भाषणात मा. आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी माल विक्री भवन उभारले जावे, अशी मागणी केली. यावर मा. ना. फुंडकर यांनी गटांना हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आमदार रणधीर सावरकर यांनी महिला गटांनी आपले स्वकर्तृत्व सिद्ध केले असल्याचे नमूद करत महिलांच्या प्रगतीचा मूलमंत्र हा गटांच्या माध्यमातून साधला जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी सरस प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रदर्शनामुळे महिला गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळणार असून, यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मनोज जाधव यांनी केले.
या कार्यक्रमाला उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड, अकोला जिल्ह्यातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि उमेद अभियानातील कॅडर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी प्रदर्शनात मांडलेल्या विविध हस्तनिर्मित वस्तू, खाद्यपदार्थ आणि कौशल्यावर आधारित उत्पादनांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले
मा. ना. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आपला व्यवसाय विस्तारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून, अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
إرسال تعليق