रोटरी क्लब खामगांवच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ थाटात संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रोटरी इंटरनॅशनल ही एक जागतिक संस्था असून आपल्या कार्यामुळे रोटरी क्लब खामगांव ही संस्था शहरी आणि ग्रामीण या दोन्ही स्तरांवर कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ रविवारी म्हणजेच २३ जून २०२४ रोजी देवजी खिमजी मंगल कार्यालयात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आलेल्या एका नियोजनबद्ध कार्यक्रमाद्वारे थाटात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वक्ते रोटरी डिस्ट्रीक्ट-३०६० चे पूर्व प्रांतपाल आशिषजी अजमेरा (धुळे), रोटरी डिस्ट्रीक्ट-३०३० चे पूर्व प्रांतपाल डॉ आनंद झुंझुनूवाला, असिस्टेंट गव्हर्नर डॉ दिलीप भुतडा (शेगांव), सुप्रसिद्ध दानदाते श्री अशोकजी झुंझुनूवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मावळते अध्यक्ष व मानद सचिव अनुक्रमे सुरेश पारीक व आनंद शर्मा यांनी आपापला पदभार नवनियुक्त अध्यक्ष व मानद सचिव अनुक्रमे विजय पटेल व किशन मोहता यांना कॉलर व लेपल पिन देऊन सुपूर्द केला. तत्पूर्वी मावळते मानद सचिव आनंद शर्मा यांनी वर्षभरात पार पाडलेल्या कार्याचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. मावळते अध्यक्ष सुरेश पारीक यांनी त्यांना वर्षभरात आलेल्या चांगल्या अनुभवांचे कथन केले आणि क्लबचे सर्व सदस्य व आपल्या कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळेस रोटरी परिवारातील मुलामुलींनी सौ दीपा जोशी आणि सौ अंकिता कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनात “शेअर द मॅजिक ऑफ रोटरी” या संकल्पनेवर सुंदर नृत्य सादर केले.
आपल्या प्रथम अध्यक्षीय भाषणात नवनियुक्त अध्यक्ष विजय पटेल यांनी रोटरीचा गौरवशाली वसा रोटरीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला. असिस्टेंट गव्हर्नर डॉ दिलीप भुतडा यांनी प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा (नागपूर) यांचा परिचय सभेस करून दिला व त्यांच्या संदेशाचे वाचन केले. प्रमुख पाहुणे आशिषजी अजमेरा यांचा परिचय देवेंद्र भट्टड यांनी करून दिला. आशिषजी अजमेरा यांनी खामगांव येथील रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये असलेल्या समर्पणाबाबत चांगल्या भावना व्यक्त केल्या आणि दान करण्याचे महत्व विषद करून सढळ हाताने रोटरी फाउंडेशनला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे नवीन कार्यकारिणीला कार्य करण्याविषयी काही महत्वपूर्ण बाबी विषद केल्या. यावेळेस रोटरी फाउंडेशनला सुमारे २१ लक्ष रुपयांची आर्थिक मदत केल्याबद्दल श्री अशोकजी झुंझुनूवाला यांचा समयोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सर्व ऑडिओ व्हिज्युअल तांत्रिक बाजू विनीत लोढाया यांनी समर्थपणे सांभाळली.
या कार्यक्रमात अनुक्रमे दहावी आणि बारावीत खामगांव शहरातून प्रथम आलेल्या आयुष जगदिशजी मंत्री आणि सिद्दाम निलेशजी जैन या विद्यार्थ्यांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे आशिषजी अजमेरा यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेल संचालन सौ तृप्ती मोहता व सौ नेहा लोढाया यांनी केले आणि त्यांना सहायक म्हणून वास्तुविशारद पंकज अग्रवाल व सुशांतराज घवाळकर यांनी कार्य पाहिले. आभार प्रदर्शन नवनियुक्त मानद सचिव किशन मोहता यांनी प्रस्तुत केले. याप्रसंगी आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांच्यासहित शहरातील गणमान्य व्यक्ती व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वरूची भोजनाने झाली.
या वर्षांची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजेपासून प्रकल्पप्रमुख भरत झुंझुनूवाला व सह-प्रकल्पप्रमुख यश गणात्रा यांचेद्वारे डॉ सोनी यांच्या श्री सुवर्णकार ब्लड बँक खामगांवच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ३५ युनिट्स रक्त जमा झाले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
إرسال تعليق