खामगांवात रोटरी क्लबव्दारे पारधी आश्रमशाळा येथे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन
रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स (RYLA) हा रोटरी क्लबद्वारे आयोजित केलेला एक गहन नेतृत्व अनुभव आहे जिथे तुम्ही नेता म्हणून तुमची कौशल्ये विकसित करू शकता. RYLA भविष्यातील भावी नेत्यांना वास्तविक जगात येणाऱ्या अडथळ्यांना कसे हाताळायचे हे शिकविण्यात मदत करते. रोटरीने RYLA द्वारे तरुणांना महत्त्वाची जीवनमूल्ये शिकवलेली आहेत. यामध्ये टीम बिल्डिंग, ग्रुप समस्या सोडवणे आणि प्रोजेक्ट टीम्समधील परस्पर व्यवस्थापनासारखे उपक्रम राबविले जातात.
असाच एक उपक्रम रोटरी क्लब खामगावने यावेळेस सजनपुरी येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी शाळा खामगांव येथे दिनांक १० व ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये या शाळेतील आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्याचा समावेश होता. प्रशिक्षक हे स्थानिक असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्याची नाळ बरोबर पकडता आली, तसेच स्थानिक प्रशिक्षकांना देखील संधी मिळाली. श्रीमती हेमलता तारस, श्रीमती चेतना पाटील, श्रीमती कीर्ती सांगळे आणि श्री गणेश बहुरूपे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले. विद्यार्थ्याना पूर्ण धडे हे मराठी भाषेतच देण्यात आल्यामुळे ते प्रशिक्षकांशी लगेच समरस झाले. "अंतर्मनातील शक्तींना जागृत करा आणि आपले उज्वल भविष्य घडवा" या संकल्पनेवर आधारित सर्व सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये "वेळेचे व्यवस्थापन", "भाषण कौशल्य व वर्तन", "व्यक्तिमत्व घडवणुकीसाठी आवश्यक पैलू", "परीक्षा कौशल्ये आणि शिकण्याचे तंत्र", “सोप्या पद्धतीने गणित शिका”, “स्वत:ला ओळखा” अशा अनेक विषयांवर दोन दिवसीय शिबिरात सत्रे संपन्न झालीत. सर्व सत्रामध्ये प्रशिक्षकांनी वेगवेगळ्या खेळांद्वारे विद्यार्थ्यांचे ज्ञानासोबत भरपूर मनोरंजनदेखील केले. प्रशिक्षणात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिफ्रेशमेंटची सोय रोटरी क्लबदवारे करण्यात आली होती.
![]() |
Advt |
ज्या उद्देशाने हे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते तो उद्देश पूर्णपणे सफल झाल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावरून जाणवले. या शिबिराच्या आयोजनात शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ आणि मुख्याध्यापक श्री राठोड सर, श्री रवी सर आणि श्रीमती स्वाती काडे मॅडम यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले ज्यामुळे विद्यार्थीभिमुख शिबीर आयोजित करता आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख श्रीमती श्रुती नथाणी, सह-प्रकल्पप्रमुख श्रीमती सारिका नवघरे, सल्लागार रो प्रफुल अग्रवाल, रो सुशांत घवाळकर, रो सुजीत भडंग, रो समीर सन्चेती, रो सौरभ चांडक यांचेसह असंख्य रोटरी क्लब सदस्यांनी अथक प्रयत्न केल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब अध्यक्ष रो सुरेश पारीक, सचिव रो आनंद शर्मा यांनी केलेले आहे आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
إرسال تعليق