आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे हार्ट अटॅक टाळणे शक्य-डॉ.राठोड
खामगाव :- सध्या परिस्थितीमध्ये सर्वाधिक मृत्यू हार्ट अटॅकने होत असल्याने हा विषय चिंतेचा आणि चिंतनाचा झाला आहे. हार्ट अटॅक टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात काही सकारात्मक बदल घडवून आणून आध्यात्मिक ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम असणारी व्यक्ती निरोगी समजली जात होती. परंतु बदललेल्या परिस्थितीनुसार आज आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम असेल तरच आरोग्य टिकून ठेवणे आणि आत्महत्याही टाळणे, शक्य आहे. कौटुंबिक कलह, ताण-तणाव, व्यर्थ चिंता, एकलकोंडेपणा, अनावश्यक स्पर्धा, मोह, व्यसन इत्यादी हार्ट अॅटकचे प्रमुख कारणे आहेत. तेव्हा आध्यात्मिक ज्ञानाचे आधारे ही कारणे टाळता येतात, असे प्रतिपादन डॉ.रतनजी राठोड, मुंबई यांनी केले.
स्थानिक कोल्हटकर स्मारक या ठिकाणी ११ फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबई येथील एमजी मेडिकल कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. रतनजी राठोड यांचा हृदय संबंधित समस्या व उपाय यावर मार्गदर्शन करणारा ‘बाय-बाय हार्ट अटॅक’, हा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणीदिदीजी, अकोला तथा वाशिम जिल्हा सेवा केंद्र संचालिका, मुख्यवक्ता डॉ. रतनजी राठोड, प्रमुख अतिथी सतीश राठी, उद्योगपती, सुरेश पारीक, अध्यक्ष, रोटरी क्लब खामगाव, शिवकुमार जांगिड, अध्यक्ष लॉयन्स क्लब, सिल्वरसिटी खामगाव, सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतलादिदी, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, ब्रह्माकुमारी सुषमादीदी यांची उपस्थिती होती.
डॉ. राठोड पुढे म्हणाले की, हार्ट अटॅक वर अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र त्या सर्व अल्पशा आणि तात्पुरत्या आहेत, हार्ट अटॅक आल्यावर उपचार करणे ही आर्थिक आणि शारीरिक रूपाने न परवडणारी बाब आहे. म्हणून रोजच्या जीवनात सकारात्मक विचार करण्याची व खानपान यावर नियंत्रण ठेवून आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे, ब्रह्माकुमारीकडून शिकविला जाणारा राजयोग हे आध्यात्मिक ज्ञानाचे व स्वउन्नतीचे साधन आहे. नजिकच्या ब्रह्माकुमारी केंद्रात जाऊन निशुल्क राजयोग मेडिटेशन समजून घेण्याचे आवाहन डॉ. रतन राठोड यांनी केले.
ब्रह्माकुमारी विद्यालयच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हातून दीपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कु.आरती लोखंडकार हिने स्वागत नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी सुषमादिदी तसेच आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी यांनी केले.
إرسال تعليق