दैवी आनंदाचा अनुपम उत्सव – निरंकारी संत समागम
संत प्रवृत्तीनेच जीवनाचे कल्याण शक्य
सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज
नागपुर, 28 जानेवारी, 2024 : “जीवनात संतांची संगत करणे आवश्यक आहे. संत प्रवृत्तीनेच जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनते आणि संतत्वाने युक्त होऊन ते सहजपणे कल्याणाच्या दिशेने अग्रेसर होते.” असे शुभाशीष निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी विशाल मानव परिवाराला संबोधित करताना केले.
सद्गुरु माताजींनी जीवनाची सार्थकता समजावताना सांगितले, की जगामध्ये सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती विद्यमान आहेत ज्यातून योग्य निवड आपण स्वत: विवेकाने करायची आहे. ब्रह्मज्ञानाने आपल्याला एक विवेकपूर्ण दृष्टिकोन प्राप्त होतो ज्याचा अंगीकार केल्याने आपण सकारात्मक भावाने भक्तीमय जीवन जगू लागतो.
महाराष्ट्रात होऊन गेलेल्या पुरातन संतांचे स्मरण करुन सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की समस्त संतांनी जीवनात ईश्वराला प्राथमिकता देण्याची शिकवण दिली आहे. संतांच्या दिव्य वाणीने आपल्या मनातील अहंकार, क्रोध, लोभ इ. आपसूकच गळून पडतात. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात आपण आपला चेहरा पाहू शकत नाही तद्वत मनामध्ये क्रोध, अहंकार व स्वार्थ भावना असेल तर जीवनात काहीही स्पष्टपणे दिसत नाही.
शेवटी सद्गुरु माताजींनी सांगितले, की ईश्वराने आपल्याला अनेक प्रकारची क्षमता प्रदान केलेली आहे. आपण हवे तर मूळ मानवी प्रवृत्तीस अनुसरुन एक दैवी जीवन जगू शकतो अन्यथा विपरीत दिशेने गेल्यास दानवी प्रवृत्तीने युक्त होऊन अध:पतित होऊ शकतो. ही निवड आपण स्वत: करायची आहे.
संत समागमात निरंकारी राजपिता रमितजी यांनी आपले भाव व्यक्त करताना सांगितले, की सद्गुरुने आपल्याला ब्रह्मज्ञान देऊन नश्वर आणि शाश्वताची ओळख करुन दिली आहे. सत्य आणि माया वेगवेगळी करुन दाखवली आहे. सत्य तेच आहे जे कायमदायम आहे आणि अशा सत्याला प्राप्त केल्यानेच जीवनात शांती नांदू शकते. शांतीची परम अवस्था परमात्माच आहे. त्याच्याशिवाय स्थायी शांती मिळणे शक्य नाही. या एका परमात्म्याला जाणून, मानून त्याच्याशी एकरुप होऊन जीवन जगल्याने सदैवकाळ शांतीची प्राप्ती होते. स्वत:ची इच्छा प्रभु इच्छेत विलीन करुन जीवनात कृतज्ञतेची भावना आली म्हणजे जीवनात शांती येते.
संत समागमाच्या तिन्ही मैदानांवर समागमागमात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी रात्रंदिवस लंगरची (मोफत भोजनाची) व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक भक्तगणांना स्टीलच्या थाळीमधून लंगर वाढले जात आहे. या व्यतिरिक्त समागम स्थळावर 5 कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये विविध खाद्य पदार्थ, चहा, कॉफी, शीतपेये इत्यादि सामग्री अत्यल्प दरात उपलब्ध आहे. देशभरातून आलेले भक्तगण सर्व भेदभाव विसरुन एकमेकांसोबत पंगतीत बसून भोजन ग्रहण करताना पाहून अनेकतेत एकता व भ्रातृभावाचे सुंदर उदाहरण प्रस्तुत होत आहे.
संत समागमात कायरोप्रॅक्टिक थेरपीचे शिबिरही आयोजित करण्यात आले आहे ज्यामध्ये अमेरिका व यूरोपमधून अनेक डॉक्टर्स आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत. या शिबिरामध्ये आतापर्यंत सुमारे हजारो व्यक्तींनी उपचार प्राप्त केले आहेत.
याशिवाय या दिव्य संत समागमामध्ये इतर अनेक सेवांमध्ये समर्पित भक्तांचा प्रेमाभक्ती व निष्काम सेवेचा भाव दृष्टिगोचर होत आहे.
إرسال تعليق