कलासंगम ग्रुप खामगांवद्वारे अजून एका कलात्मक कार्यक्रमाची पेशकश

खामगांव शहर हे खूप आधीपासूनच कला आणि संस्कृती यांना राजाश्रय देणारे शहर म्हणून ओळखले जाते. अनेक मान्यवर लेखक, कवी आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी या गांवाची कीर्ती दूरदूरपर्यंत नेलेली आहे. गेल्या कित्येक दशकांपासून उभे असलेले कोल्हटकर स्मारक मंदिर या गोष्टीचा साक्षीदार आहे की खामगांवमध्ये कलेचे प्रयोग व्ह्यायचे आणि त्यासाठी रंगमंचदेखील अस्तित्वात होते. परंतु मध्यंतरी लोकं टीव्ही आणि मोबाईलच्या नादात या कलांना विसरले. मुंबई, पुणे, नागपूर येथे गेल्यावर मात्र हीच मंडळी संगीताचे आणि नाटकांचे कार्यक्रम बघून परत यायची. लोकांच्या याच कलासक्तीला लक्षात ठेऊन आजच्या ६ महिन्यांआधी शहरात "कलासंगम" नावाच्या ग्रुपची  स्थापना झाली आणि उद्देश लक्षात येताच पाहता पाहता अंदाजे २४० परिवार याची सदस्य झालीत आणि वर्षाला ३ ते ४ कार्यक्रमांची मेजवानी खामगांवकरांना  मिळणार हे निश्चित झाले.



पहिला कार्यक्रम श्री संदीप पंचवटकर यांचा "मस्त मस्त म्यूजिकल तंबोला" हा झाला आणि या कार्यक्रमाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. लोकांच्या वाढत्या अपेक्षांना पूरक असा कार्यक्रम रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान खामगांव शहरात "कलासंगम" या ग्रृपव्दारे आयोजित "ब्लॅक अँन्ड व्हाईट"  हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. जसा सूर्य पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोप-यात पोहोचतोच व चराचर प्रकाशमान करून टाकतो, चैतन्यमय करून टाकतो तसाच "ब्लॅक अँन्ड व्हाईट" या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी व गायक आणि नृत्य कलाकार यांनीही आपल्या स्वरसाधनेने कोल्हटकर स्मारक मंदिराचा कानाकोपरा तृप्त करून टाकला. कुणा एकाच नाव घेतल्यास दुसऱ्यासोबत ते अन्याय केल्यासारखे होईल. सूत्रसंचालक श्री राहुल सोलापूरकरांपासून ते स्टेजवर गालीचा अंथरणाऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी आपलं शंभर टक्के योगदान दिल्यामुळेच अशी कलाकृती उभी राहिली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन, संगीत आणि नृत्य यांनी कोल्हटकर स्मारक मंदिरातील अक्षरशः सर्व रसिकांच्या मनावर मोहिनी घातली, त्यांचे डोळे व कान तृप्त करून टाकले आणि एक अभिजात प्रस्तुती सादर केली.


कलासंगम ग्रुपने तर कमालच केली आणि अत्यंत शिस्तबद्ध व वक्तशीर आयोजन कसे करता येईल याचा एक पायंडाच खामगांव शहरात पाडून दिला. कलासंगमव्दारे आयोजित कार्यक्रम वेळेवर सुरू होतात हा संदेश सर्व कलारसिकांपर्यंत पोहोचल्यामुळेच कार्यक्रमाच्या दीड तास आधीपासूनच चांगली जागा मिळविण्यासाठी कार्यक्रम स्थळी लोकांची गर्दी होणे सुरू झाले होते. कलासंगम ग्रुप संचालकांच्या आतिथ्यशील व विनयपूर्वक वागणुकीने येणाऱ्या प्रत्येक कलारसिकाच्या मनाचा ठाव घेतला. दोन दर्जेदार कार्यक्रम लागोपाठ दिल्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत हे निश्चित. या कार्यक्रमाआधी बैठक व्यवस्थेत आणि मंचावर आवश्यक त्या सुधारणा कोल्हटकर स्मारक मंदिराच्या प्रबंधन समितीद्वारे करण्यात आल्या त्यामुळे कोल्हटकर स्मारक मंदिराचे रूपच पालटलेले बघावयास मिळते. अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संपूर्ण खामगांवकर आयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहेत आणि येणा-या काळात कुठली कला मेजवानी मिळणार आहे याची आतुरतेने वाट पाहत आहेत.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक सदस्य श्री प्रकाश केडिया, श्री प्रकाश मुंधडा, डॉ भगतसिंग राजपूत आणि श्री तुषार शाह यांच्यासमवेत श्री प्रदीप जांगीड, डॉ चंद्रकांत जाधव, श्री किशोर गरड, श्री नरेश नागवाणी, सीए आशिष मोदी, श्री अजय अग्रवाल, श्री आशिष चौधरी, श्री प्रकाश खंडेलवाल (नांदुरा) आणि डॉ अभय गोयंका (शेगांव) व ईतर असंख्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली.

Post a Comment

أحدث أقدم