अनेक ई - महा सेवा केंद्रात जनतेची मात्र अव्वाच्या सव्वा दर घेवून होत आहे लुट - तक्रार
खामगांव (जनोपचार) :- खामगांव येथील सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचेकडे खामगांव तालुक्यातील बहुतांश सर्व ई - महासेवा केंद्रांमध्ये शासकीय दरापेक्षा जास्त पैसे घेवून दाखले दिले जातात आणि सदर ई- महासेवा केंद्र नियोजीत ठिकाणी न चालविता शहरात येवून चालविले जातात आणि यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना कोणत्याही कागदपत्राकरीता शहरात वेळ व पैसा खर्च करून यावे लागते आदी संदर्भात तक्रार दिली होती.
त्या तक्रारीची दखल घेत खामगांव तालुक्यातील जवळपास २४ ई- महा सेवा केंद्र हे तक्रारकर्त्याने केलेल्या तक्रारीनुसारच आढळल्याने त्यांचे त्यांचा परवाना रद्द केला आहे.
मात्र जे ई - महा सेवा केंद्र सुरू आहेत. त्या ठिकाणी देखील दर्शनीय भागात कोणतेही दरपत्रक लावलेले नसून या ठिकाणी नागरीकांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात अशी पुन्हा तक्रार केली असता संबंधीत सदर अधिकारी यांनी ई महा सेवा केंद्राची तपासणी केल्याचे तक्रारकर्त्यांना कळविले आहे. परंतु ज्यावेळेस चौकशी करण्यासाठी अधिकारी गेले त्यावेळेस एका सेतू केंद्राची चौकशी करण्यासाठी ३० मिनिटांच्या जवळपास वेळ लागत असेल तर दर्शनीय भागात दरपत्रक लावले आहे याचा पुरावा तक्रारकर्त्यांनी मागीतला असता तो देण्यास असमर्थता दर्शविली आणि तसे लेखी सुध्दा दिले. परंतु चौकशी करत आहे म्हणून दोन-चार फोटो काढायला किती वेळ लागला असता आणि ते का काढले गेले नाही.... याचाच अर्थ असा सुध्दा निघत आहे की, संबंधीतांना कोठेही जावून तपासणी न करता केवळ कार्यालयात बसून कागदे काळी केली आणि तक्रारकर्त्यांना लेखी पाठवून दिले.
म्हणून तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचेकडे तक्रार केली असून ई - महासेवा केंद्र चालकांना पाठिशी घालणार्या अधिकार्यांवर सुध्दा आता कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जर अधिकार्यांनी नियमाप्रमाणे चौकशी करते वेळेस फोटो घेतले असते तर त्यामध्ये स्पष्ट दिसून आले असते की दर्शनी भागात दरपत्रक आहे की नाही आणि विशेष बाब म्हणजे जर कोणत्याही ग्राहकाला ई - महा सेवा केंद्र संचालका विरूध्द तक्रार करावयाची असेल तर त्याने दर पत्रक बोर्डावरच तक्रार कोठे करायची याचीही माहिती देणे गरजेचे आहे आणि हे सर्व आपले सरकार सेवा केंद्र तपासणी सुचिमध्ये अनुक्रमांक १० वर नमुद केलेले आहे. पण त्यावरही थातुर मातुर उत्तर तक्रारकर्त्याला लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.
एकंदरीतच सर्वत्र सावळा गोंधळ सुरू असून अधिकारी सुध्दा मलीदा लाटत आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना मनमानी करण्याची सुट देत असल्यामुळे आता ग्राहकांची लुट करणारे आपले सरकार सेवा केंद्र चालक व त्यांना कोणतीही चौकशी न करता पाठिशी घालणारे तपासणी अधिकारी यांचेवर सुध्दा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
إرسال تعليق