खामगाव प्रेस क्लब 'आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्काराने सन्मानित


खामगाव:  पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने खामगाव प्रेस क्लबला अमरावती विभागातून 'आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 
       मराठी पत्रकार परिषद मुंबई द्वारा दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू येथील श्री साई नाट्यगृह येथे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा तसेच राज्यस्तरीय जिल्हा व तालुका अध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, राज्य अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, पत्रकार विशाल परदेशी, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांच्यासह राज्य स्तरीय पदाधिकारी, नामवंत पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात खामगावातील पत्रकारांची मातृसंस्था व प्रतिष्ठीत संघटना म्हणून ओळख असलेल्या खामगाव प्रेस क्लबला मान्यवरांच्या हस्ते अमरावती विभागातून 'आदर्श तालुका पत्रकार संघ' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांच्यासह पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. 
खामगांव प्रेस क्लब ही संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हा पासुन मराठी पत्रकार परिषद मुंबई या संघटनेशी संलग्नित आहे. पत्रकरांच्या हितासाठी व पत्रकारांवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासोबतच सामाजिक उपक्रम राबवून खामगाव प्रेस क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच सर्वच स्तरातील पत्रकार बांधवांना सोबत घेऊन पत्रकारांच्या एकतेवर व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे.  खामगाव प्रेस क्लबच्या कार्याची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने  आदर्श तालुका पत्रकार संघ या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post