मनाचा प्रभाव शरीर व संबंधावर पडतो - बीके डॉ.राजेश

खामगाव : (Janopachar news network)आज मानवाचे शारीरिक स्वास्थ धोक्यात आलेले आहे. दिवसेंदिवस आजाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे. ह्यामागचे मुख्य कारण आहे मानव मनाची नकारात्मकता म्हणजेच मन अस्वस्थ आहे. मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, संबंधांवर पडतो. म्हणून सर्वप्रथम मनाचा इलाज करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बी. के. डॉ. राजेश मुंबई यांनी येथे केले. स्थानिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रायगड कॉलनी खामगाव च्या वतीने आयोजित राजयोग मेडिटेशन द्वारा हेल्दी माईंड हेल्दी बॉडी कार्यक्रम १७ डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्रीमती सु.रा.मो. महिला महाविद्यालयामध्ये पार पडला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी, प्रमुख पाहुणे डॉ.मधुसूदनजी भट्टड (बालरोगतज्ञ), डॉ. शुभांगी घुले , डॉ.के. एम. थानवी, डॉ. हर्षल  भुईभार , मुख्य मार्गदर्शक डॉ.ब्रह्माकुमार राजेश  एमडी तसेच ब्रह्माकुमारी सुषमादिदी यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर ब्रह्माकुमारी दिव्यादिदींनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ तसेच ईश्वरीय साहित्य देऊन स्वागत केले. मोटिवेशनल स्पीकर बी. के. डॉ. राजेश एमडी यांचे ब्रह्माकुमारी शकुंतलादिदी यांच्याहस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांनी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची विधीवत सुरुवात केली. मनात विचारांची निर्मिती कशी होते, विचारांना सकारात्मक दिशा देऊन आपले स्वास्थ, संबंध, कार्यक्षेत्र सकारात्मक बनवणे शक्य आहे. याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण तसेच प्रत्यक्ष अनुभवयुक्त मार्गदर्शन डॉ. राजेश यांनी केले. शेवटी वैज्ञानिकदृष्ट्या राजयोग मेडिटेशनचे महत्त्व सांगून मेडिटेशन कॉमेंट्रीद्वारे उपस्थित जनसमुदायाकडून राज योगाचा अभ्यास करून घेतला. सर्वांनी मेडिटेशनमध्ये शांतीची अनुभूती घेतली. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन सुषमादिदी यांनी केले स्थानीय ब्रह्माकुमारी सेवा केंद्र रायगड कॉलनी या ठिकाणी त्रिदिवसीय राजयोग मेडिटेशन शिबिर १८, १९, २० डिसेंबर, वेळ दुपारी ४ ते ५.३० यावेळी राहील, असे सुषमादिदींनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post