खामगाव येथे शनिवारी काँग्रेसची भव्य सद्भावना संकल्प सभा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या २६ एप्रिल शनिवार रोजी खामगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्भावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 


        गेल्या काही दिवसांपासून समाजातील जातीय तसेच धार्मिक विद्वेष वाढत चालला आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असून देशाच्या शत्रूंकडून सुरक्षिततेला आव्हान दिल्या जात आहे. तसेच अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असून देश व महाराष्ट्र अस्थीर करण्याचे काम केल्या जात आहे. समाज एकसंघ असावा, तिथे जातीय तसेच धार्मिक द्वेषाला, तिरस्काराला काहीही महत्त्व असू नये हेच काँग्रेसचे उद्दिष्ट राहले आहे. त्यामुळेच समाजातील वाढत्या विद्वेषाला प्रेमभावनेचे उत्तर देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान बचाव व सद्भावना रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृह, नांदुरा रोड येथे सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्भावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी, बुलढाणा जिल्हा निरीक्षक राजेंद्र राख, आमदार धीरज लिंगाडे यांचेसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सद्भावना सभेचे उद्दिष्ट, काँग्रेसचे आगामी काळातील ध्येय, धोरण व आगामी निवडणूक संदर्भात  प्रदेशाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या सद्भावना संकल्प सभेस बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post