ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त भारतात नव्हे तर जगातील १५२ देशात साजरी होत आहे. त्यांनी दिलेले संविधान टिकवायचे असेल तर बौद्ध धर्माचा अस्मितेचा प्रश्न असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन समाजभूषण व पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने यांनी आज येथे सकाळी जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जात असून येत्या १६ आणि १७ तारखेला बोधगया येथे अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी अशोक सोनाने यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी करण्यात आले होते. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , संविधानाचे वाटप, बाबासाहेबांना आदरांजली भन्तेजींचे मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांना मानाचा असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंचावर अशोकभाऊ सोनाने, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नेते शरदभाऊ वसतकार, जिल्हाध्यक्ष एम टी इंगळे, जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, व्ही. एम. भोजने, वंचित जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे , व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गवई सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष दादाराव हेलोडे यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष खासणे ताई, प्रेस क्लब अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, काँग्रेस पदाधिकारी, माळी समाजाचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment