पुढे पुढे करून इच्छुक उमेदवारांची दमछाक..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशा!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने राजकीय नेते, कार्यकर्त्यांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहे. नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात रेंगाळल्यामुळे सुमारे चार वर्षांपासून लटकल्या आहेत. या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक आता रडकुंडीला आले आहेत. नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तसेच वॉर्ड आणि गावातील नागरिकांच्या पुढे पुढे करून त्यांना आता नको नको झाले आहे; परंतु निवडणुका का होईनात, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करीत आहेत.आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला अनेक स्थानिक नेत्यांचा हा राग अनेकदा उफाळून आला होता. आमदारकी लढविणाऱ्यांनी मात्र त्या निवडणुकीत या सर्व इच्छुकांना उमेदवारीचे आश्वासन देऊन आपल्या निवडणुकीत वापरून घेतला. निवडणूक लवकर व्हावी यासाठी सरकारही काही करू शकत नसल्याने हे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते हतबल झाले आहेत. त्यांची हतबलता सध्या सर्वत्र दिसत आहे.
राजकीय लोकांच्या या अडचणींबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचेही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने फार हाल सुरू आहेत. अगदी छोटी छोटी कामे करण्यासाठी नागरिकांना फार अडचणी येत आहेत. कोणीही अधिकारी, प्रशासक नीट लक्ष देण्यास तयार नसल्याने अनेक गावांमध्ये विशेषतः नगरपालिका क्षेत्रांमध्ये भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेही या निवडणुका लवकर घेऊन तिथे लोकप्रतिनिधी कार्यरत होतील, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक आहेत. म्हणून आपल्या पोस्टर, बॅनरवर भावी म्हणून मिरवत असतात. मात्र किती दिवस ‘भावी म्हणून मिरवायचे, असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
Post a Comment