'CRP,अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र चालकात नाराजीचा सूर!
खामगाव :- लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक गावातून एकही महिला या योजनेतून वंचित राहू नये यासाठी शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी यातून सर्व महिलांना लाभ मिळावा यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न केले गेले.त्याचा लाभ अनेक महिलांना झाला.त्या बदल्यात महायुतीला लाडक्या बहिणींनी सत्तेचा मुकुट चढवूनही दिला, मात्र गाव पातळीवर ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य घेण्यात आले,त्या समुदाय संसाधन व्यक्ती (CRP), अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र चालकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने कबूल केले होते,तो मोबदला त्यांना अजूनही मिळाला नसल्याने त्यांचेत शासनाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना धूमधडाक्यात सुरु केली होती.बुलडाणा जिल्ह्यातील लाखो बहिणींनी यासाठी अर्ज सादर केले होते.ही योजना 100 टक्के यशस्वी करण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्ती (CRP),अंगणवाडी सेविका व सेतू सुविधा केंद्र चालकांना देखील सहभागी करून घेण्यात आले होते.प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळावा याकरिता जिल्हास्तरापासून ग्रामस्तरापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठका घेतल्या होत्या.लाडक्या बहिणीच्या खात्यावर निवडणुकीपूर्वी साडेसात हजार रुपये जमाही करण्यात आले आहे, परंतु समुदाय संसाधन व्यक्ती,अंगणवाडी सेविका व सेतू केंद्र धारकांना मानधना पोटीचा एक रुपयाही मिळाला नाही त्यामुळे त्यांच्यात सद्या शासनाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला आहे. वास्तविक समुदाय संसाधन व्यक्ती,अंगणवाडी सेविकांना नियमित काम करण्याबरोबरच अर्ज भरण्याचे काम सोपविण्यात आल्याने कामाचा ताण वाढला होता.शासनाच्या विविध उपक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावत शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे राष्ट्रीय काम आणि राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात मोलाचा वाटा ह्या सेविकांचा आहे.लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना याकामी राबविण्यात आले, मात्र त्यासाठीचा मोबदला अजूनही मिळाला नसल्याने नाराजीचा सूर त्यांचेत उमटत आहे.
Post a Comment