काँग्रेसवाले खोटं बोलून मते मिळवतात : मुख्यमंत्री सैनी
आकाश फुंडकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची प्रचार सभा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महिलांना दोन हजार रुपये व 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते पण सत्तेत येऊन दोन वर्ष झाले तरी अद्याप आश्वासन पाळले नाही असे सांगत काँग्रेसवाले खोटं बोलून मते मिळवतात अशी टीका हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी रविवार 17 नोव्हेंबर रोजी खामगाव येथे आयोजित प्रचार सभेत केली.
भाजपा -महायुतीचे उमेदवार आ. आकाश फुंडकर यांच्या प्रचारार्थ स्थानिक नगर पालिका मैदानावर आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर आ. पंकजाताई मुंढे, आ. आकाश फुंडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माळी समाजाचे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे स्थानिक माळी समाज बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री सैनी म्हणाले की देशात दोन प्रमुख विचारधारा आहेत. एक काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काम करते तर दुसरी जे जगभरात लोकप्रिय झाले असे सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. काँग्रेसने देशावर सतत अन्याय केला व देशातील समस्या वाढविण्याचे काम केले पण मोदींनी एक एक समस्या दूर करत लोकांचे जीवन सुसह्य बनविण्याचे काम केले. एकीकडे विकास आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसवाले कोर्टात गेल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे येथील महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी असून या निवडणुकीत तिचा सुपडा साफ होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सात जागा महायुती जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदींनी देशासह महाराष्ट्रात केलेल्या विविध विकासकामांचा पाढा त्यांनी वाचून दाखवत काँग्रेसकडे नीती नाही, व्हिजन नाही, नियत नाही आणि नेतृत्वही नाही असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी हरियाणा प्रमाणे डबल इंजिन सरकार पुन्हा बनवन्यासाठी व मोदींचे हात बळकट करण्यासाठी खामगावात कमळ फुलवा असे आवाहन सैनी यांनी केले.
आता आकाशदादांची हॅट्रिक : पंकजा मुंढे
केंद्रात मोदी सरकारने हॅट्रिक केली तशी आता खामगावात आकाश फुंडकर यांची हॅट्रिक होणार आहे असे आमदार पंकजाताई मुंढे यावेळी म्हणाल्या. भाऊसाहेब फुंडकर व गोपीनाथ मुंढे हे जिवाभावाचे मित्र होते. जय वीरू प्रमाणे त्यांची जोडी होती. आकाश सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध असून तो माझा लहान भाऊच आहे. त्याने तिसऱ्यांदा फक्त आमदारच होऊ नये तर यापेक्षा मोठी प्रगती करावी अशी मनीषा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तत्पूर्वी आ. आकाश फुंडकर यांनी आपल्या भाषणात माजी आमदार सानंदांवर घणाघाती टीका केली. सानंदांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात चार दंगली झाल्या. व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यात आले. हिंदू- मुस्लिम तरुणांना टारगेट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांचे आयुष्य बरबाद करण्यात आले. वरली मटका कोण चालवत होते ? सावकारी कोण करीत होते. अश्लील व्हिडिओ कोण दाखवत होते? कोणाच्या सावकारीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?? असे प्रश्न त्यांनी नागरिकांना विचारून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सानंदामुळे दहा लाख रुपये दंड भरावा लागला असेही मंचावर उपस्थित सैनी यांना उद्देशून त्यांनी सांगितले. सानंदांनी कधी मतदारसंघात शांतता नांदू दिली नाही. आम्ही मात्र दहा वर्षात एक भांडण तंटा होऊ दिला नाही. ही शांतता अबाधित ठेवायची असेल व सर्वांगीण विकास होऊ द्यायचा असेल तर सानंदांना दूरच ठेवा असे ते म्हणाले. सभेचे संचालन एडवोकेट रमेश भट्टड व जितेंद्र पुरोहित यांनी केले तर आभार चंद्रशेखर पुरोहित यांनी मानले. यावेळी मंचावर आ. संदीप सुर्वे, सागर फुंडकर, सचिन देशमुख, सारिका डागा, ज्ञानदेवराव मानकर, संजय अवताडे, ओंकारआप्पा तोडकर, अंबादास पाटील, नीलकंठ सोनोने, संतोष देशमुख, चंद्रशेखर पुरोहित, संजय शिनगारे, राजेंद्र धनोकार, अमोल अंधारे, शरद गायकी, सुरेश वावगे, राजेंद्र बघे, गजाननराव देशमुख, सुरेश गव्हाळ, विजय भालतिडक, शांताराम बोधे, हरसिंग साबळे आदी उपस्थित होते.
काँग्रेसवाले ओबीसींची मते घेतात पण त्यांचेच शोषण करतात. मोदी सरकारने पहिल्या पंचवार्षिक मध्ये ओबीसी आयोग स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसने विरोध केला होता. राज्यसभेत बहुमत नसल्याने त्यावेळेस हा आयोग होऊ शकला नाही पण दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये मोदींनी हा आयोग स्थापन केला. त्यामुळे ओबीसींना विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे असेही यावेळी नायबसिंह सैनी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अंधारे, जसवंत सिंग यांचा भाजपात प्रवेश
यावेळी अमोल अंधारे, काँग्रेसचे माजी नगरसेवक जसवंतसिंग शीख, त्यांचे सुपुत्र ऍड. परमवीरसिंग शीख, पिंपळगाव राजा जिह्वा परिषद सर्कल मधील मयूर सोनवणे व इतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. विशेष म्हणजे अमोल अंधारे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोन नंतर त्यांनी तो परत घेतला. आज त्यांनी जाहीररित्या भाजपात प्रवेश घेऊन राजकारणात पदार्पण केले आहे.
Post a Comment