विदर्भाला मिळाला पहिल्यांदाच सन्मान!
डॉ.अशोक बावस्कर यांची लॉयन इंडिया मॅगेझीनच्या सहयोगी संपादक पदी नियुक्ती
खामगांव दि. ०८: सेवाकार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या व शतकोत्तर वाटचाल करीत असलेली लॉयन्स इंटरनॅशनल संस्था संपूर्ण भारतात मागील ८० वर्षापासून कार्यरत आहे. भारतात सुमारे ८७०० लॉयन्स क्लब व ३ लाख पेक्षा जास्त लॉयन्स सदस्यांव्दारे विविध सेवा उपक्रमाचे माध्यमातून समाजसेवा करित आहे.
संपूर्ण देशातील लॉयन्स क्लबस् ला प्रशासनीक मार्गदर्शन व सेवाकार्याची माहिती सदस्यांपर्यंत व सोबतच जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी इ.स. २००४ पासून देशपातळीवर 'द लॉयन इंडिया' हे मासिक निरंतर प्रकाशित केल्या जात आहे. लॉयन्स जगतात वर्ष २०२५ हे भारतासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. कारण कोलकाता येथील एक भारतीय वरिष्ठ लॉयन सदस्य लॉ. ए.पी. सिंग हे आंतरराष्ट्रीय लॉयन्स संस्थेचे अध्यक्ष पद भूषविणार आहे. त्यांचे मार्गदर्शनात व माजी आंतरराष्ट्रीय निदेशक लॉ. जितेंद्रसिंह चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली लॉयन इंडिया मॅगेझिन असोसिएशनची वर्ष २०२४-२०२६ ची कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये बंगलुरू येथील माजी आंतरराष्ट्रीय निदेशक लॉ. वामसिधर बाबु यांची संपादक पदी निवड झाली.
महाराष्ट्र राज्यातून लॉयन्स मल्टीपल ३२३४ प्रतिनिधी म्हणून लॉयन्स क्लब खामगांव चे जेष्ठ सदस्य व माजी प्रांतपाल लॉ.डॉ. अशोक बावस्कर यांच्या प्रदीर्घ प्रशासनीक व सेवाकार्याची दखल घेऊन सहयोगी संपादक म्हणून निवड करण्यात आली. दि. १ व २ ऑगष्ट रोजी बंगलुरु येथील हॉटेल ताज मध्ये संपन्न झालेल्या लॉयन इंडिया मॅगेझीन असोसिएशनच्या संमेलनामध्ये त्यांना सदरचे नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष लॉ. जितेंद्रसिंग चव्हाण, मुख्य संपादक लॉ. वामसिधर बाबु, लॉ. विजयकुमार राजु, लॉ. आर. मुरुगन, लॉ. क्रिष्णा रेड्डी इ. माजी आंतरराष्ट्रीय निदेशक उपस्थित होते. या वर्षापासून लॉयन इंडिया मॅगेझीन प्रिंट व सॉफ्ट कॉपी अशा दोन्ही स्वरुपात प्रकाशित होणार आहे. तसेच लॉयन्स जगतात सुमारे ५५ देशांच्या प्रतिनिधींना व भारतातील सुमारे ३ लाखाचे वर लॉयन्स सदस्यांपर्यंत हे मासिक नियमित पोहचणारआहे.
आजपावेतो आपण केलेल्या सेवाकार्य व प्रांतीय तसेच बहुप्रांतीय स्तरावर मागील १५ वर्षापासून करित असलेल्या प्रशासनीक कार्याची ही पावती असल्याचे व आपल्यावर टाकलेल्या विश्वासास खरे उतरण्यासाठीउत्कृष्ठ कार्य करण्याचा मानस माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील नियुक्तीसाठी लॉयन्स बहुप्रांतात लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे असे लॉयन्स क्लब खामगांवचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Post a Comment