"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे विविध उपक्रम संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये सध्या सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत विविध उपक्रम साजरे होत आहेत. यामध्ये तालुक्यातील विविध ठिकाणांहून माती गोळा करून ती अमृत कलशात भरणे, अमृत कलशाची फेरी काढणे, एका हातात माती घेऊन त्या पोझमध्ये सेल्फी काढणे व पोर्टलवर अपलोड करणे, पंचप्रण शपथ घेणे, अमृत कलश बागेची संरचना करणे, संस्थेतील विविध विभागांची व परिसराची साफसफाई मोहीम इत्यादी अनेक उपक्रम राबविण्याचे शासनाद्वारे सुचविण्यात आले होते. संपूर्ण देशातून २ कोटींपेक्षा जास्त सेल्फीज "मेरी माटी मेरा देश" या पोर्टलवर अपलोड करणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट ठरलेले आहे ज्यायोगे एकाच उपक्रमाच्या जास्तीत जास्त सेल्फीजचा चीनचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद घेण्यात आलेला विक्रम मोडकळीस निघेन. महाराष्ट्र शासनाने त्यापैकी एक कोटी सेल्फीज "मेरी माटी मेरा देश" या पोर्टलवर अपलोड करण्याचे मानस केलेले आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच शिक्षण संस्था त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माननीय डॉ. विनोद मोहितकर सर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली, तंत्रशिक्षण अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ.विजय मानकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाअंतर्गत व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबईचे संचालक डॉ प्रमोद नाईक आणि नागपूर विभागाच्या उपसचिव श्रीमती कांचन मानकर यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याने संस्थेने हे यश संपादन करण्यात यश मिळविलेले आहे असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ.समीर प्रभुणे यांनी केलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतन खामगांवचे प्राचार्य तथा जिमखाना अध्यक्ष डॉ समीर प्रभुणे यांचे प्रोत्साहनाने उपाध्यक्ष प्रा राजेश मंत्री, सचिव प्रा सागर जुमडे, सहायक श्री दिलीप शेजोळे, जिमखाना विद्यार्थी सचिव श्री शिवम खेतान आणि संस्थेतील इतर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचेद्वारे संस्थेत उपरोल्लेखीत सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आलेले आहेत.जाहिरात
८ ऑगस्ट २०२३ पासून या सर्व प्रकल्पांना सुरुवात झाली आणि गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी अमृत कलश फेरीद्वारे "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमाची सांगता झाली. या फेरीला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्याचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि सुमारे ५५० जणांच्या उपस्थितीसह अमृत कलश फेरी संस्थेत काढण्यात आली. या वेळेस कलशयात्रा फेरीत सर्वांनी देशप्रेम भावनेने ओतप्रोत अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. या सर्व उपक्रमांमुळे शैक्षणीक परिसर चैतन्यमय झालेले असून देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे जोपासल्या गेली आहे यावर दुमतच नाही.
Post a Comment