रोटरी क्लब खामगांवद्वारे “रोटरी जनुना तलाव परिक्रमा ” चे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खामगांववासियांना चांगलेच स्मरणात असेल की आजच्या ५ वर्षांपूर्वी अत्यल्प पावसामुळे जनुना तलाव हा त्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पूर्णपणे सुकला होता. त्यामुळे त्या परिसरातील भूजल पातळी तर खालावलीच होती सोबतच जलचर जीवसृष्टीचे देखील अपरिमित नुकसान झाले होते.परंतु रोटरी क्लब खामगांवने ही निसर्गाने दिलेली एक संधी समजून लोकवर्गणीद्वारे या तलावातील शेकडो टन गाळ उपसून काढला होता आणि तो गाळ नजीकच्या शेतक-यांना मोफत उपलब्ध करून दिला होता. म्हणजे तलावाच्या खोलीकरणासोबतच शेत जमिनींचे पुनर्जिवित करण्याचे कार्य रोटरीच्या हातून त्यावेळेस घडले होते. सोबतच "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या उक्तीप्रमाणे मागील ४ वर्षांपासून रोटरीने इतर काही निसर्गप्रेमी मंडळांच्या साहाय्याने या क्षेत्रात झाडे झुडपे व जनोपयोगी वृक्ष लागवडीचे कार्य हाती घेतले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हे क्षेत्र अगदी उन्हाळ्यातसुद्धा हिरवेगार दिसते आणि या परिसरात उन्हाचा प्रकोप कमी असून खूप थंडावा जाणवतो. प्राण्यांच्या आणि पक्षांच्या गुंजारवाने हा परिसर चैतन्यमय वाटतो.
खामगांव शहर व आसपासच्या इतर गावांना याबद्दल माहिती व्हावी आणि त्यांनादेखील प्रेरणा मिळावी यासाठी रोटरीने येत्या रविवारी म्हणजेच ७ मे २०२३ रोजी पहाटे ०५-४५ ला “रोटरी जनुना तलाव परिक्रमा” चे आयोजन केलेले आहे. ही परिक्रमा अंदाजे ६ किलोमीटर लांबीची असून निसर्गाला अगदी जवळून बघण्याची आणि अनुभवायची संधी रोटरीने या निमित्याने सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेली आहे. सदर परिक्रमेची सुरुवात किन्ही महादेव रोडने जनुना गांवापासून १ किलोमीटर पुढे असलेल्या जनुना तलावाच्या किना-याने होईल याची कृपया नोंद घ्यावी आणि या परिक्रमेत मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी व पर्यावरण जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्पप्रमुख रो डॉ आनंद झुनझुनुवाला, सह-प्रकल्पप्रमुख रो सुनील नवघरे, रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे आणि रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया यांनी केलेले आहे. परिक्रमेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व परिक्रमेनंतर चहाची व्यवस्था क्लबद्वारे करण्यात आलेली आहे.
Post a Comment