रोटरी क्लब खामगांवद्वारे मोफत “गर्भसंस्कार शिबीराचे” आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- रोटरी क्लब खामगांवद्वारे नियमितपणे नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे नवीन नवीन प्रकल्पांची आखणी करण्यात येत असते. याच अंतर्गत सुसंस्कारीत नवीन पिढी घडावी म्हणून येत्या रविवारी म्हणजेच १५ एप्रिल २०२३ रोजी स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे सकाळी सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान मोफत “गर्भसंस्कार शिबीराचे” आयोजन करण्यात आलेले आहे.
बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते. प्रत्येक आई-वडिलांचेच आपल्या मुलाचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात. जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहवं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते त्यापैकीच गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बालावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भावस्थे दरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मुल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय. पारंपारिक मान्यतांनुसार बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरु होतो आणि याच काळात त्याची पर्सनॅलिटी देखील विकसित होते. खूप पूर्वीपासूनच विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे. रिसर्च अनुसार विचार केला तर बाळाच्या ५०% मेंदूचा विकास हा गर्भामध्येच होतो. भारतीय संस्कृती नुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. महाभारतामध्ये अर्जूनचा मुलगा अभिमन्यूने देखील आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती.
यामध्ये अकोला येथील सुप्रसिद्ध वक्त्या डॉ मीनाक्षी मोरे व डॉ कल्पना भागवत यांचेद्वारे गर्भवती मातांना गर्भसंस्काराबद्दल माहिती प्रदान करण्यात येणार आहे. यात गर्भसंस्कारासोबतच आहार, व्यायाम, ध्यानसाधना व इतर अनेक पैलूंवर भर देण्यात येणार आहे ज्याद्वारे नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते.
सदर अभिनव उपक्रम खामगांव शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणार असल्यामुळे गर्भवती माता आणि त्यांच्यासमवेत इतर स्त्रियांनासुद्धा या शिबिरात येण्याचे निमंत्रण प्रकल्पप्रमुख रो सौ सारिका नवघरे, रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे आणि रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया यांनी दिलेले आहे.
Post a Comment