माजी लोकप्रतिनिधींनी फक्त" मा." शब्द वापरल्यास फसवणूकीचा गुन्हा दाखल करा!
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : लोकप्रतिनिधी हे बहुधा आपलाकार्यकाळ संपल्यानंतर किंवा पराभूत झाल्यानंतर संबधीत पदाच्या आधी माजी शब्द न वापरता त्या जागी फक्त मा. करतात. परंतू अनेकवेळा नागरिकांचा असा समज होतो की मा. हा शब्द माननीय या अर्थाने असावा. त्यामुळेच ते सध्या लोकप्रतिनिधी असल्याचे भासवतात. अनेकवेळा लग्न पत्रिका किंवा कुठलाही समारंभ असला तर माजी लोकप्रतिनिधीच्या जागी त्या पत्रिकांमध्ये मा. शब्द वापरतात यामुळे फसवणूक होत असल्याची बाब समोर आल्याने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे. सामजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही माजी लोकप्रतिनिधी, जसे की माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच, किंवा माजी पंचायत समिती सभापती, आपल्या नावासमोर माननीय किंया मा. असा उल्लेख करीत असतात, जरी त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नसले किंवा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी. ही प्रथा चुकीची असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर फक्त माजी असे उल्लेख करावे व मा. हे पदनाम वापरणे टाळावे, उदा. मा. आमदार, मा. अध्यक्ष जि.प., मा. सभापती इत्यादी माजी आमदार, माजी सभापती असे लिहावे. जर कोणी याबाबत निर्देशांचे पालन करीत नसेल, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारच्या गैरवापरामुळे संबंधितांवर आयपीसी कलम ४२० (फसवणूक) किंवा 'भारतीय न्याय संहितेच्या अन्य संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा विचार करण्यात यावा. पेपरमध्ये, वृत्तपत्रात, जाहीरात देतांना आजी-माजी असा स्पाष्ट्र उल्लेख असावा असे जितेंद्र जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Post a Comment