शिक्षणरूपी आखाड्याचा महामंडलेश्वर: शिक्षक
शिक्षण हे समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही राष्ट्राच्या यशाचे मापन त्याच्या नागरिकांच्या शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असते. शिक्षण हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक म्हणून काम करते. यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक ,प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि समाज बदलाचा शिल्पकार असतो. म्हणूनच शिक्षकाला महामंडलेश्वर म्हणणे योग्य ठरेल.
शिक्षण -समाजाचा पाया:-प्राचीन काळापासून भारतात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु शिष्य परंपरा ही आपली संस्कृती आणि शिक्षणाचा गाभा होती. तक्षशिला आणि नालंदा यासारख्या प्राचीन विद्यापीठांमध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. त्यावेळी शिक्षण हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नव्हते तर जीवन जगण्याच्या योग्य पद्धती शिकवणारी प्रणाली होती. आज शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे.तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक व्यापक आणि सुलभ झाले आहे. मात्र त्याचबरोबर व्यावसायिकीकरणामुळे शिक्षणाचा हेतूही बदलू लागला आहे. शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी असले पाहिजे, नफ्यासाठी नव्हे .याच कारणामुळे शिक्षणाला शिक्षणरूपी आखाडा असे म्हणता येईल.
शिक्षक शिक्षणरुपी आखाड्याचा महामंडलेश्वर:-शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक मार्गदर्शक नसून, तो समाजाचा एक प्रमुख आधारस्तंभ असतो. तो ज्ञानाचा महामंडलेश्वर आहे जो शिक्षण रुपी आखाड्यात शिष्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना सक्षम बनवतो. महामंडलेश्वर ही पदवी हिंदू संन्याशी संप्रदायात मोठ्या आध्यात्मिक गुरूंना दिली जाते. शिक्षणाच्या क्षेत्रातही शिक्षक हा एका महामंडलेश्वर प्रमाणे असतो, कारण तो समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्याचे कार्य करतो .विद्यार्थ्यांना योग्य विचारसरणी देऊन त्यांना एक आदर्श नागरिक घडवितो.
महामंडलेश्वर रुपी शिक्षकाचे गुण:-एका शिक्षकांमध्ये खालील गुण असायला हवे.
ज्ञानसंपन्नता आणि सखोल अभ्यास: शिक्षक हा विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देणारा नसावा, तर त्याने विषयाची सखोल माहिती ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय विविध विषयांमध्ये आवड आणि सखोल विचारसरणी असणे आवश्यक आहे.
नैतिकता आणि आदर्श मूल्ये: विद्यार्थ्यांना शिक्षण देतानाच शिक्षकांनी चारित्र्य आणि नैतिकता यांचे महत्त्व शिकवले पाहिजे. शिक्षण फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी नसून ते जीवन जगण्यासाठी असते ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे शिक्षकाचे काम होय.
प्रेम, करुणा आणि संयम: एक चांगला शिक्षक हा विद्यार्थ्यांबद्दल प्रेम ,करुणा आणि सहनशीलता बाळगतो. तो विद्यार्थ्यांच्या चुका समजून घेतो आणि त्यांना सुधारण्यासाठी मदत करतो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर: आजच्या डिजिटल युगात शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक प्रभावी बनवले पाहिजे. ऑनलाइन शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि ई लर्निंग सारख्या संधींचा शिक्षकांनी आपल्या अध्यापनात योग्य उपयोग करायला पाहिजे.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व: महामंडलेश्वर रुपी शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिकवत नाही, तर त्यांना प्रेरित करतो. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, ध्येय आणि सकारात्मक दृष्टिकोन देणे हा त्याचा उद्देश असतो.
महामंडलेश्वर रुपी शिक्षकाची जबाबदारी:
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे - फक्त पुस्तका पुरते शिक्षण न देता विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि नैतिक दृष्टिकोन देणे हे शिक्षकाची जबाबदारी आहे.
शिक्षणाचे व्यावसायिकीकरण रोखणे: शिक्षणाला केवळ आर्थिक फायद्याच्या दृष्टीने न पाहता, समाजसेवेच्या भावनेने पाहणे आणि शिकविणे ही पण शिक्षकाचीच जबाबदारी होय.
नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर: ऑनलाइन शिक्षण, डिजिटल साधने आणि तांत्रिक ज्ञानाचा योग्य वापर करणे.
विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद ठेवणे-विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि भावना समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही पण शिक्षकाचीच जबाबदारी आहे.
समाज सुधारण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करणे- शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, भेदभाव आणि अशिक्षितपणा यांना दूर करणे. त्याचप्रमाणे समाजातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखविणे हे शिक्षकाचे कर्तव्य होय.
महामंडलेश्वर शिक्षक-समाज बदलाचा वाहक: खरे शिक्षण हे समाजाच्या परिवर्तनाचे साधन असते. महामंडलेश्वर शिक्षक हा समाजाला पुढे नेण्याचे काम करतो.तो केवळ शिक्षक नसून, तो एक मार्गदर्शक, विचारवंत आणि समाजसेवक असतो. आजच्या युगात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवून आणली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद ,सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामंडलेश्वर शिक्षकांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण समाज उजळवला आहे.
शिक्षक आणि महामंडलेश्वर या दोघांमधील साम्य: शिक्षक आणि महामंडलेश्वर या दोघांमध्ये काही साम्य आहेत. जरी त्यांची भूमिका आणि कार्यक्षेत्रे वेगवेगळी असली तरीही त्यांच्यातील मुख्य साम्ये खालील प्रमाणे आहेत.
ज्ञान प्रसारक-शिक्षक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देतात आणि त्यांचे भविष्य घडवितात तर महामंडलेश्वर धार्मिक आणि अध्यात्मिक ज्ञान देतात, समाजाचे नैतिक आणि अध्यात्मिक मार्गदर्शक करतात
मार्गदर्शक व गुरु: दोघेही समाजात मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन करतात तर महामंडलेश्वर साधकांना अध्यात्मिक आणि धार्मिक जीवनासाठी मार्गदर्शन करतात.
शिस्त आणि मूल्ये: शिक्षक शिस्त आणि नैतिकता शिकवतात तर महामंडलेश्वर ही धार्मिक आणि नैतिक जीवनशैलीची शिकवण देतात.
समाजावर प्रभाव:- दोघेही समाजातील लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. शिक्षक समाज घडवितात, तर महामंडलेश्वर समाजाला धर्म आणि संस्कृतीशी जोडून ठेवतात.
आदर्श व्यक्तिमत्व: शिक्षक आणि महामंडलेश्वर हे दोघेही समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात.
वरील सर्वांचे तात्पर्य असे की, शिक्षक हा समाजाच्या विकासाचा कणा आहे, शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक ,प्रेरणास्त्रोत आणि समाज बदलाचा वाहक आहे .शिक्षणाला व्यावसायिक आखाडा बनवण्यापेक्षा ते समाजासाठी एक बदलाचे साधन बनवले पाहिजे.
महामंडलेश्वर रुपी शिक्षक हा केवळ एका शाळेचा किंवा महाविद्यालयाचा भाग नसतो, तर तो संपूर्ण समाजाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करणारा एक दीपस्तंभ असतो. त्याच्या शिकवण्यानेच एक सुसंस्कृत ,सुशिक्षित आणि प्रगतशील समाज उभा राहतो .शिक्षक आणि महामंडलेश्वर यांचे कार्य जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असले तरी दोघांचेही उद्दिष्ट समाजाच्या प्रगतीसाठी ज्ञानाचा प्रसार करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे हेच आहे .म्हणूनच शिक्षण रुपी आखाड्यात शिक्षक हा खऱ्या अर्थाने महामंडलेश्वर असतो हे नक्की.
प्रविण रामचंद्र क्षीरसागर
पर्यवेक्षक
श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल खामगाव ,ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा.मोबाईल क्रमांक 9422882848
Post a Comment