रोटरी क्लब खामगांवद्वारे
“मॅराथॉन सिझन-७”
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क ;-जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी म्हणून रोटरी क्लब खामगांव मागील ७ वर्षांपासून मॅराथॉनचे आयोजन करीत आहे. धावण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचे गुणांक सुधारण्यासाठी मदत होते असे अनेक ठिकाणी दर्शविले गेले आहे. हे महाधमनी कडक होण्याची प्रक्रिया देखील उलट करू शकते जी नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते. नियमितपणे धावल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जुनाट आजार टाळण्यास मदत होते, स्नायूंची शक्ती वाढते, वजन कमी होते, मानसिक संतुलन व समन्वय साधता येतो, तणाव दूर होतो इत्यादी.
या सर्व फायद्यांना लक्षात ठेऊन रोटरी क्लब खामगांवने इनरव्हील क्लब खामगांव व रोटरॅक्ट क्लब खामगांव यांचेसमवेत यावर्षी रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजेपासून स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान या ठिकाणी ३ किमी (स्त्री-पुरुष वयोगट ४५ पर्यन्त), ३ किमी (स्त्री-पुरुष वयोगट ४५ पेक्षा जास्त), ३ किमी (संयुक्त पती-पत्नी), ५ किमी (स्त्री-पुरुष खुले वयोगट) व १० किमी (स्त्री-पुरुष खुले वयोगट) अशा विविध श्रेणींमध्ये मॅराथॉनचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धेकरिता सिल्व्हरसिटी हॉस्पिटल खामगांव यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. तसेच सर्व श्रेणींतील विजेत्यांसाठी हजारो रुपयांची भव्य रोख बक्षिसे व मेडल्सचे नियोजन करण्यात आलेले आहे. सवलतीच्या ५० रुपयांच्या दरात नोंदणी करणा-या सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वगळता इतर सर्व नोंदणीकृत सहभाग्यांना स्पर्धेत परिधान करावयाचे टी-शर्ट मोफत मिळणार आहेत तर सर्वच श्रेणींतील सहभाग्यांना शर्यतीच्या वाटेत आर.ओ. पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक आणि नाश्ता मिळेल. इयत्ता ७वी पेक्षा छोट्या मुलामुलींना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. स्पर्धा सुरु होण्याआधी स्पर्धकांकरीता वार्मअप सेशनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नांव नोंदणी उमा फूडस (मोहन मार्केट), प्रेम एजन्सीज (जलम्ब नाका), शगुन कलेक्शन (फरशी) व सकळकळे कॉम्प्युटर्स (टॉवर चौक) या ठिकाणी करता येईल. सदर शिबिराच्या अधिक माहितीसाठी आयोजन समिती सदस्य अभिषेक शेलारका (मोबाईल क्रमांक ९५५२५५६०८०) किंवा विजय मोदी (मोबाईल क्रमांक ८८८८२०८०३०) यांचेशी संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८७६७७१०३३६ वर Hi असा इंग्रजी मेसेज पाठविल्यास नोंदणीसंबंधीचे गुगल फॉर्म व स्पर्धेविषयीची अन्य माहिती उपलब्ध होईल. तरी प्रतिस्पर्ध्यांनी आतापासून रोज थोडा थोडा सराव करावा व जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या आरोग्यविषयक स्पर्धेत सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्पप्रमुख समीर संचेती, सह-प्रकल्पप्रमुख विशाल गांधी, रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, रोटरी क्लब सचिव किशन मोहता यांनी केलेले आहे. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण सर्व गटातील स्पर्धा संपल्यानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment