कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर यांनी केला केस गळती आजारग्रस्त गावाचा दौरा

केसगळती झालेल्या गावांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करा - ना. ॲड आकाश फुंडकर 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क  : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्यातील पहूरजिरा, निंबी, माटरगाव, मच्छिंद्रखेड,कठोरा, कालवड, बोंडगाव, भोनगाव, तरोडा कसबा या गावांमध्ये केसगळती मुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. या गावांमधील स्थानिक पाण्याचे स्त्रोत दूषित असण्याची,व इतरही शक्यता असल्याने या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी पाण्याचे,रेशन धान्याचे, जे रुग्ण बाधित आहेत त्यांचे त्वचेचे ,आवश्यकता असल्यास रक्ताचे नमुने पुढील तपासणी करण्यासाठी पाठवलेले आहेत याचे रिपोर्ट आल्यानंतरच नक्की कारण समजणार आहे त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाची प्राथमिक तपासणी करून औषधोपचार सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना केस गळती थांबून पुन्हा केस येणे सुरू झाले आहेत याचप्रमाणे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे  या गावांना वाण धरणाचा पाणीपुरवठा शेगाव येथूनच  टँकरद्वारे करण्यात यावा असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी प्रशासनाला  दिले आहेत.

आज कामगार मंत्री आकाश फुंडकर हे शेगाव तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी प्रशासनाला वरील निर्देश दिले. यावेळी गावातील नागरिकांशी तसेच रुग्णांशी संवाद साधला. या समस्येवर वैद्यकिय अधिकारी तसेच प्रशासनाचे संशोधन सुरू आहे .प्रशासन रुग्णांची काळजी घेत असून उपाययोजना करत आहे.आम्ही नागरिकांसोबत आहोत, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच आरोग्य विभागांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मंत्री आकाश फुंडकर यांनी गावकऱ्यांना, रुग्णांना केले.



यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा डॉ भुसारी,  जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा डॉ गीते, शेगाव तहसीलदार श्री बाजड, शेगांव तालुका आरोग्य अधिकारी डॉ दीपाली बाहेकर, गट विकास अधिकारी शेगाव श्री शेख, मजिप्रा श्री नागपुरे , ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी श्री नावकार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post