हायकोर्ट :शेतकऱ्यांचा रस्त्यावरील अधिकार कायम राखला
नागपूर : जनोपचार न्यूज नेटवर्क :- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांचा शेतात जाणाऱ्या रस्त्यावरील अधिकार कायम ठेवला. तसेच, या अधिकाराला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली.किसन तायडे, प्रल्हाद थेटे, अंबिका तायडे, अमोल तायडे व सुनील सावलकर अशी दिलासा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यांची बोरगाव मंजू येथील शेतात जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. हे शेतकरी २००५ पासून त्या रस्त्याचा उपयोग करीत होते. दरम्यान,२०२१ मध्ये रूपम बिसेन यांनी या भागातील शेतजमीन खरेदी केल्यानंतर हा रस्ता बंद केला. पीडित शेतकऱ्यांनी नायब तहसीलदारांकडे केलेला अर्ज ४ जुलै रोजी मंजूर झाला व बिसेन यांना रस्त्यातील अडथळे दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. बिसेन यांनी उप-विभागीय अधिकाऱ्यांकडे केलेला रिव्हिजन अर्ज ३० सप्टेंबर रोजी नामंजूर करण्यात आला. परिणामी, बिसेन यांनी उच्च न्यायालयात धाव होती. न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी रेकॉर्डवरील विविध बाबी लक्षात घेता ती याचिकादेखील फेटाळून लावली. पीडित शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. स्वप्निल वानखेडे यांनी कामकाज पाहिले.
Post a Comment