"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण" योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
खामगांव दि.९:-शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजना सुरू केली आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी खामगांव तालुक्यातील सर्व महिलाना सुचित करण्यात येते की, "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा,घटस्फोटीत,परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला यांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार असून दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या पात्र लाभार्थी महिलांना दि. १ जुलै २०२४ पासून दरमहा रु. १५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण" या योजनेकरिता विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावयाचा आहे.सदर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावयाची असून लाभार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे (१) रेशनकार्ड, (२) मतदान ओळखपत्र, (३) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व (४) जन्म दाखला या पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि,पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज भरतांना कोणीही घाई करुन चुकीच्या पध्दतीने अर्ज भरु नये. तसेच सदर योजनेची नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे निःशुल्क (मोफत) असून त्यासाठी कोणतीही फी नाही. सेतू केंद्रावर अर्ज भरणारे व्यक्ती पैशाची मागणी करत असल्यास त्याबाबत तहसिल कार्यालय खामगांव आणि महिला व बालविकास अधिकारी कार्यालय खामगांव कडे लेखी तक्रार अर्ज दाखल करावा.तसेच आपला अर्ज आणि कागदपत्रे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे देवू नये अथवा जमा करू नये,असे आवाहन खामगांव तहसिलदार अतुल पाटोळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
Post a Comment