मिशन ओ २ व नगर परिषद यांच्या वतीने ‘ग्रीनाथॉन’ स्पर्धेचे आयोजन

कृष्णप्रकाश प्रसाद होणार सहभागी !
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क)- मिशन ओ २ (मिशन ऑक्सीन बहुउद्देशीय संस्था) व खामगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जुलै २४ रोजी ‘ग्रीनाथॉन’ स्पर्धेचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरापासून जवळच असलेल्या जनुना तलाव येथून सकाळी ७ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ४ किलो मिटरची ही स्पर्धा घेण्यात येणार असून १२ वर्षावरील स्पर्धक यात सहभागी होऊ शकतात.


जनुना तलावाच्या गेटपासून सुरु होणार्‍या या स्पर्धेचा समारोप जनुना तलावाजवळ होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे कृष्णप्रकाश प्रसाद हे स्पर्धकांसोबत या स्पर्धेत धावणार आहे. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धक व मान्यवरांच्या हस्ते जनुना तलावाच्या काठावरील परिसरात पिंपळ, वड, कडूलिंब, चिंच यासह विविध देशी जातीच्या २५०० रोपट्याचे रोपण करण्यात येणार आहे.
१२ हजाराची रोख बक्षिसे
या स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणार्‍या स्पर्धकांना एकूण १२ हजाराची रोख बक्षीसे व मेडल देऊन त्यांचा गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट व रोपटे देण्यात येणार आहे. आरोग्य निरोगी राखण्याचा एक भाग म्हणून ग्राीनाथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके व मिशन ओ २ च्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी साई डेंटल क्लिनीक, नॅशनल हायस्कुल समोर, खामगाव येथे किंवा ९००४७१७२७२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post