खामगाव शहरातील फेरीवाल्यांना न्याय मिळावा
वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
खामगाव प्रतिनिधी: शहराची मुख्य बाजारपेठ "ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र" म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ फेरीवाले व्यावसायिकासह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. खामगाव शहरातील फेरीवाल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या नेतृत्वात शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, खामगाव शहरात वाहतुकीची समस्या सुरळीत करण्यासाठी प्रत्येक चौफुलीवर पोलिसांची नेमणूक करून ट्राफिक नियंत्रित करता येऊ शकते. परंतु तसे न करता खामगाव नगरपालिकेने ३१ जानेवारी रोजी नागरी पद विक्रेता समितीच्या माध्यमातून गुप्त मीटिंग घेऊन केवळ छोट्या छोट्या व्यावसायिकांना छळण्याचा सपाटा लावला आहे. शहरातील लहान सहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले यांच्या विषयी शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची बंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. सदर फेरीवाल्यांचे ८६५ रजिस्टर्ड सभासद आहेत. शासनाच्या पीएम स्वनिधी व मुद्रा लोन योजनेअंतर्गत फेरीवाल्यावर बँकांचे कर्ज आहे. सभासदांना कोणतेही पूर्वसूचना न देता किंवा लाऊडस्पीकर द्वारे शहरातील फेरीवाल्यांना सुचित न करता खामगाव शहरातील मुख्य चौकामध्ये "ना फेरीवाला क्षेत्र" म्हणून घोषित करून त्यांच्या परिवाराच्या पोटावर लाथ मारण्याचे काम नगरपालिकेने केले आहे ही बाब निषेधार्थ आहे. या संदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी यांना २ फेब्रुवारी व आज ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्याकरिता गेले असता मुख्याधिकारी गैरहजर होते. त्यामुळे सदरचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गेला व तेथे उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करत त्यांना अन्यायकारक ठरावाबाबत फेरीवाल्यांच्या समस्या सांगून खामगाव शहरातील फेरीवाल्यांना न्याय मिळावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केली
यावेळी तालुकाअध्यक्ष प्रभाकर वरखेडे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, वाहिद जामा, प्रकाश दांडगे, नितीन सूर्यवंशी, रमेश गवारगुरु, आनंद नागे, शब्बीर भाई ,समीर खान, शेख करीम शेख रहीम,सुभेदार खान दिलदार खान, दीपक जैन, पुरुषोत्तम मेसरे, शेख नसीर शेख निसार, मोहम्मद इरफान अ. सलाम, मुकेश केळोदे, नितीन नथ्थानी, शेख जावेद शेख हुसेन यांच्यासह २०० ते ३०० फेरीवाले व्यावसायिक उपस्थित होते.l
Post a Comment