*शासकीय तंत्रनिकेतन खामगांवचे राष्ट्रीय प्रमाणन संस्था (एन.बी.ए.) कमेटीद्वारे मुल्यांकन संपन्न*


खामगाव :- अभियांत्रिकी संस्थेत शिकविल्या जाणा-या अभ्यासक्रमांची गुणवत्ता तपासणी करून त्यांना नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडीटेशन नवी दिल्ली (राष्ट्रीय प्रमाणन मंडळ) द्वारे मानांकन प्रदान केल्या जाते. शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव येथे अभियांत्रिकी संस्थांसाठी आवश्यक असलेले मानांकन प्रदान करण्यासाठी दिनांक १७ ते १९ मार्च या दरम्यान अणुविद्युत विभागाकरीता एन.बी.ए. चमूने भेट दिली. या चमूत नवी दिल्ली येथील ए.आय.सी.टी.ई.चे माजी सचिव डॉ आलोक मित्तल हे चेअरमन म्हणून तर डॉ निसार अहमद हे अणुविद्युत विषयतज्ञ म्हणून समाविष्ट होते. चमूचे आगमन व स्वागत झाल्यानंतर प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी संस्थेच्या माहितीचे पॉवरपॉईन्टद्वारे सादरीकरण केले आणि चमूने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.  

दिनांक १७ व १८ मार्च रोजी चेअरमन डॉ आलोक मित्तल यांनी निकषानुसार संस्था स्तरावर विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा प्रत्यक्षात आढावा घेतला जसे की कर्मशाळा, ग्रंथालय, अँकेडमिक्स, संगणक प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, कार्यालय, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, जिमखाना, खेळांची मैदाने, माजी विद्यार्थी सभागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, प्रशिक्षण व आस्थापना कक्ष, प्लेसमेंट रेकॉर्ड्स इत्यादी. या प्रत्यक्ष आढाव्याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या समितींनी तयार केलेल्या कागदपत्रांद्वारे अभिलेख व संसाधनांची पाहणी केली व समिती प्रमुखांना विविध प्रश्न विचारले. कार्यालयातील आस्थापना विभाग, अकौंट विभाग, विद्यार्थी विभाग, कर्मचा-यांचे पगारपत्रक, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती इत्यादी सर्व बाबी तपासून पाहिल्या. अणुविद्युत विषयतज्ञ डॉ निसार अहमद यांनी अणुविद्युत विभागातील सैध्तान्तिक व प्रयोगशाळेच्या सर्व शैक्षणिक बाबी तपासल्या आणि सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिनांक १८ मार्च रोजी संस्थेत माजी विद्यार्थी व उद्योगपती यांची सभा घेण्यात आली. या सभेकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ नागपुर विभागाच्या उपसचिव सौ कांचन मानकर, बुलढाणा जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण समिती अध्यक्ष उद्योगपती श्री रोहितजी गोएनका, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री वीरमणी, सचिव प्रा सचिन सोनी हे उपस्थित होते. दिनांक १९ मार्च रोजी एन.बी.ए.समितीने एक्झिट मिटिंग घेतली आणि संस्थेच्या मजबूत व कमकुवत मुद्दयांविषयी माहिती दिली. समितीच्या एकंदरीत भूमिकेवरून ते समाधानी दिसले आणि एका महिन्यानंतर लागणा-या निकालानंतर बहुधा संस्थेला मानांकन मिळेल असा कयास सर्व स्तरांवरून व्यक्त होत आहे. संस्थेतील सर्व कर्मचा-यांमध्ये यावेळेस सकारात्मकता व कार्याप्रती समर्पकता दिसून आली.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ विनोद मोहितकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली,  अमरावती विभागीय सहसंचालक डॉ विजय मानकर यांच्या मार्गदर्शनातून व प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांच्या कौशल्यपूर्ण प्रशासनात संस्थेतील अणुविद्युत विभागप्रमुख          प्रा देवसरकर व त्यांची अणुविद्युत विभागाची शिक्षक व शिक्षकेतर चमू, समन्वयक प्रा परांजपे, सहसमन्वयक प्रा पद्मणे, विभागप्रमुख डॉ ढोले, शैक्षणिक अवेक्षक व जिमखाना उपाध्यक्ष प्रा मंत्री, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा काकड व सर्व विभागप्रमुख प्रा वाघमारे,               प्रा मुन्धडा, प्रा आटोळे, प्रा कुलकर्णी, प्रा चोपडे, प्रा नीळ, प्रा सौ भारसाकळे, प्रबंधक श्री राणे, श्री टिकार, श्री सपकाळ, श्री सुरेश ठाकरे यांचेसह संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.            

      

Post a Comment

Previous Post Next Post