स्वतंत्र पत्रकारिता संकटात
पत्रकारांनी नेहमी लोकांच्या बाजूने लेखणीचा वापर करायला हवा यात दुमत नाही. लोकशाहीत सत्ता आणि माध्यमे लोकांसाठीच काम करणारी असली पाहिजेत हा आदर्श विचार अलीकडे झपाट्याने समाप्त होण्याच्या मार्गावर आहे असे दिसत आहे. देशपातळीवर माध्यमांना आणि एकूणच पत्रकारितेला अच्छे दिन आहेत असे म्हणण्याचे धाडस होत नाही. याला भाजप आणि प्रधानमंत्री मोदी कारणीभूत आहेत का ? या प्रश्नाला माझे उत्तर ते एकटेच जबाबदार नाहीत असे असेल. एनडीटीव्हीचे अँकर रवीशकुमार यांच्या राजीनाम्यानाने देशभरात जी चर्चा सुरु झाली आहे तिने आगामी काळात देशातील माध्यमांचे स्वरूप काय असेल याचा आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या देशातील उद्योगपतींना मीडिया हाऊस विकत घेण्याची प्रेरणा अचानक व्हावी आणि ते सगळे संघ परिवाराच्या ताटाखालील मांजरे निघावीत असे अचानक झाले नाही. त्यासाठी आवश्यक ते वातावरण अगोदर माध्यम जगतात तयार करण्यात आले आणि आता लोखंड गरम आहे असे दिसताच हातोडा मारण्यात आला एवढाच त्याचा अर्थ आहे.
काही लोकांच्या नजरेत वागळे ,पुण्यप्रसून वाजपेयी,अभिसार शर्मा किंवा त्याच पंगतीतले रवीशकुमार इत्यादी पत्रकार याना केंद्रस्थानी ठेवून होणारी चर्चा वांझोटी आहे कारण त्यांना वाटते की हे सगळे पत्रकार डाव्या विचारसरणीचे आहेत त्यांना संघ परिवार करीत असलेले प्रयत्न किंवा त्यांची होणारी सरशी सहन होत नाही म्हणून काहीतरी खुसपट काढून हे लिब्रान्डु पत्रकार आकाशपाताळ एक करताना दिसत आहेत. मुळात पत्रकारिता आहे तिथेच आहे. तिला काहीही झालेले नाही. हे मूठभर लोक इतके छान चालले असताना उगाच भुई धोपटून कारण नसताना आकांडतांडव करीत आहेत. पुरोगामी विरुद्ध हिंदुत्ववादी या स्वरूपातही या वादाकडे बघणारे लोक भरपूर आहेत. वरच्या पातळीवर कोणत्या वैचारिक व्यूहरचना आखल्या जातात आणि त्यातून सत्य मांडणाऱ्या लोकांचे कसे पराभव घडवून आणल्या जातात अशा कट कारस्थानांची सामान्य लोकांना माहिती नसते.
रवीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्याची गेल्या दोन दिवसापासून मोठी चर्चा सुरु असली तरी त्याची तयारी फार पूर्वीच झाल्याचे दिसते. मोदी सत्तेत आल्यानंतर आयबीएन ७ हा ग्रुप अंबानी यांच्या ताब्यात गेल्यावर पत्रकारितेवर नियंत्रण असले पाहिजे हा विचार प्रबळ व्हायला सुरुवात झाली. आपल्याकडे या ग्रुपचे आयबीएन-लोकमत हे चॅनेल होते. निखिल वागळे यांच्या हाती त्याची धुरा होती. २०१४ च्या आसपास सगळ्याच भाषिक चॅनेलमध्ये डाव्या विचारांच्या ब्राह्मण पत्रकारांची चलती होती ,ती आजही आहे. भाजपच्या विचारसरणीला अतिरेकी विरोध सुरु झाल्यावर '' या डाव्या माकडांना ठेचले पाहिजे '' अशी प्रतिक्रिया संघ परिवारात उमटताना आपण सगळ्यांनी बघितल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून निखिल वागळे वैचारिक खुन्नस काढताहेत हे लक्षात आल्यावर आधी त्यांच्यावर लगाम लावण्यात आला या घटनेत रवीशकुमार यांच्या राजीनाम्याची मांडणी केलेली दिसते.
माध्यमे टीव्ही असोत वा वृत्तपत्रे त्यांनी कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचा जो समज करून घेतला त्यातून पुढचे सगळे रामायण घडताना दिसत आहे. लोकांना अक्कल वाटण्याचे कंत्राट घेतलेल्या माध्यमांनी नेहमी इतरांच्या कर्तव्यावर बोट ठेवले आहे मात्र स्वतःच्या जबाबदाऱ्या ते जाणीवपूर्वक विसरले असे माझे आकलन आहे. अपुरा अभ्यास आणि जबाबदारीचे भान सैल झाले की केवळ इतरांच्या चेहऱ्यावरील धूळ दिसायला लागते,आपला चष्मा पण साफ करायचा असतो हेच माध्यमे विसरली आहेत. हा तर्क प्रिंट आणि इलेक्ट्रानिक या दोघांनाही लागू होतो. राहिला प्रश्न गेल्या आठ वर्षातील मोदींच्या एकूणच वर्तनाचा तर ते कोणताही सभ्य भारतीय व्यक्ती सहन करणार नाही असेच राहिले आहे. जगातील कोणत्याही सत्ताधाऱ्यांना त्यांच्या उणिवांवर बोट ठेवणारे घटक आवडत नसतात मोदी त्याला अपवाद कसे असतील ?
सत्ताधारी म्हणून काँग्रेस मला अजिबात आवडत नाही मात्र जेव्हा काँग्रेस आणि भाजप अशी तुलना होते तेव्हा मला काँग्रेसच्या बाजूने झुकावेसे वाटते. त्याची अनंत करणे आहेत त्यापैकी महत्वाचे हे आहे की एवढ्या वर्षाच्या सत्तेत कधी काँग्रेसला माध्यमे आपल्या मालकीची असावीत असे कधीच वाटले नाही. चांगल्या आणि वाईट गोष्टींची माध्यमांनी दखल घेतलीच पाहिजे त्यासाठी सत्तेवर सुद्धा अंकुश असला पाहिजे हे त्यांना मान्य होते दुर्दैवाने सध्याच्या भाजप आणि प्रामुख्याने मोदी-शहांच्या भाजपला ते मान्य नाही , लोकशाही इथूनच मान टाकायला सुरुवातकरते. मी ईश्वर,दैवीशक्ती किंवा नशीब मानत नाही मात्र जे पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम मला मान्य आहे. गेल्या एका दशकात भारतीय माध्यमांनी पॅकेजच्या हव्यासापायी जे पेरले तेच आता उगवायला सुरुवात झाली आहे. स्वतंत्र मेंदूच्या नागरिकांना भक्तात रूपांतरित करण्याचा विडा घेतलेली माध्यमे स्वतः कधी भक्त होऊन बसलीत हेच त्यांच्या ध्यानात आले नाही.
नरेंद्र मोदी मोठे प्रस्थ आहेत ,त्यांचे सोडा जिल्हास्तरावर काम करणारा कोणताही नेता किंवा आमदार अलीकडे स्वतःची चिकित्सा सहन करीत नाही. माझे काही चुकते हे त्याला मान्य नसते. त्यामुळे चिकित्सक,प्रामाणिक किंवा खरी पत्रकारिता करणे तारेवरची कसरत बनली आहे. स्वतंत्र पत्रकारिता सध्याच्या काळात कुणाच्या तरी नोकरीत राहून होऊ शकते असे मलाही वाटत नाही. तुम्ही कोणत्याही माध्यमात काम करा , जेवढा स्पेस मिळतो त्यातही उत्तम पत्रकारिता करता येणे शक्य आहे मात्र '' रोखठोक '' पत्रकारिता करण्यासाठी आता सोशल मीडिया हाच एकमेव पर्याय उरला आहे. रवीशकुमार किंवा निखिल वागळे यांनी त्यासाठी युट्युबचा आश्रय घेतला आहे. त्याभीतीने केंद्र सरकार युट्युबसाठी सुद्धा नियंत्रण प्रणाली आणण्याच्या हालचाली करीत आहे , मला वाटते ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणाऱ्या संघ परिवारातील लोकांनाही ते आवडणार नाही.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248
Post a Comment