22-बुलढाणा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024;

     निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

बुलडाणा जनोपचार न्यूज नेटवर्क:-   भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा विधानसभा मतदार संघासाठी प्रशासन सज्ज असून निवणूक कामाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी दिली. 

*निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :* 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार दि. 29 आक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि.  20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

3 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार : पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 15 ऑक्टोंबर रोजी 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघ मतदारांची संख्या याप्रमाणे : पुरुष मतदार 1 लक्ष 58 हजार 787, महिला मतदार 1 लक्ष 46 हजार 882 तर तृतीयपंथी 16 असे एकूण 3 लक्ष 5 हजार 685 मतदारांना  मतदानाचा हक्क बजावता येईल. सर्व्हिस व्होटर 1090, दिव्यांग मतदार 2082,  वयवर्षे 85 पेक्षा जास्त असलेले 4786 मतदार असून, दिव्यांग व 85 पेक्षा जास्त असलेल्या वयोमानातील मतदारांना होम वोटींग सुविधा पुरविण्यात येणार आहे.

337 मतदान केंद्र : 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी 337 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असून, त्यामध्ये 79 शहरी मतदान केंद्र व 258 ग्रामीण मतदान केंद्र आहेत. 

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाकरीता एफएसटी पथक -5, एसएसटी पथक-6, व्हीएसटी -4 पथक सज्ज असून सदर पथके 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय एकूण 31 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूकीच्या कामाकरिता 1 हजार 850 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

कामकाजाचे व्यवस्थापन : बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कार्यालय, तहसिल कार्यालयाच्या बाजूला जिल्हा निवडणूक इमारत येथे नामनिर्देशन पत्रे सादर करणे, नामनिर्देशनपत्राची छाननी केली जाईल.  निवडणूकीसंबंधी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलडाणा येथे होईल. शारदा विद्यालय, चिखली रोड, बुलडाणा येथे मतदान साहित्य वाटप व साहित्य जमा केले जाईल. तसेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघ कार्यालय, तहसिल कार्यालयाच्या बाजूला जिल्हा निवडणूक इमारत येथे स्ट्राँग रुमची व्यवस्था व मतमोजणीचे ठिकाण राहिल. 


Post a Comment

أحدث أقدم